काव्य संमेलनाचा नवा प्रयोग...-
By Admin | Updated: July 19, 2015 21:33 IST2015-07-19T21:33:37+5:302015-07-19T21:33:37+5:30
फेरफटका...

काव्य संमेलनाचा नवा प्रयोग...-
साहित्यक्षेत्रात काव्य महत्त्वाचे मानून, त्याची सेवा करणारे अनेक साहित्यिक कवी कोकणाने दिले आहेत. अनेक प्रयोग झाले. आता कवी संमेलनाचा अनोखा प्रयोग गोवा कला अकादमीमध्ये होत आहे. सलग ४८ तास काव्य वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येथील मंडळींनी पुढाकार घेतला आहे. देशभरातील नामवंत कवी या संमेलनात सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र, गोवा या दोन राज्यांतील प्रमुख व नामवंत कवी आपल्या काव्य प्रतिभेचे दर्शन या संमेलनात रसिकांना घडविणार आहेत. यापूर्वी साहित्य संमेलनामध्ये कवी कट्टा असायचा. संमेलनाचा तो एक अविभाज्य घटक असायचा. नवोदित, मुरलेले, नामवंत असे कवी वेगवेगळ्या विषयांवर आपली पेशकश सादर करायचे. काव्यातून मांडण्यात आलेला विषय हा सामाजिक, आर्थिक विषमतेवर व वास्तव घटनांवर आधारित असलेला पाहायला मिळायचा. काव्याचे सर्व प्रकार अशा संमेलनातून ऐकायला मिळायचे. मात्र, त्यालाही मर्यादा असायची. आता मात्र गोव्यात होणाऱ्या या काव्य संमेलनाची चर्चा महाराष्ट्रभर सुरु आहे.
महाराष्ट्रातून नामवंत कवी सहभागी होतीलच. त्यामध्ये अनेक विषयांनाही वाचा फुटण्याचा संभव आहे. सौमित्र, फ. मु. शिंदे यांच्याबरोबरच अनेक नामवंत कवींच्या सहवासात नवोदितांचाही एखादा कार्यक्रम तेथे होणार आहे. साहित्य क्षेत्रात वावरणाऱ्या सर्व संघटनांनी या प्रयोगाचे स्वागत केले आहे. सलग ४८ तास काव्यवाचन करणे, याचाच अर्थ रसिक काव्यात डुंबून जातील, हे निश्चित. पूर्वी विदर्भातल्या दुष्काळावर संमेलनात आवर्जून कविता वाचल्या जायच्या. विठ्ठल वाघ यांची कपाशीवरची कविता, मंगेश पाडगावकर यांच्या गाजलेल्या कविता, रामदास फुटाणे यांची वात्रटिका या साऱ्यांनी संमेलनात रंगत भरायची. त्यामध्ये विदर्भ, मराठवाडा या भागातून आलेले कवी तेथील वास्तव संमेलनाला उपस्थित असलेल्या रसिकांसमोर मांडायचे व त्यातून प्रांत, धर्म, जातीभेद बाजूला सारुन मांगल्यासाठी एकात्मतेचा संदेश सर्वदूर पसरायचा. संदेश देणाऱ्या कविता हा त्यामागचा हेतू असायचा. आता मात्र अनेक संमेलनामधून या विषयाला हरताळ फासला गेल्याचे पाहायला मिळते आहे. या पार्श्वभूमीवर गोवा कला अकादमीचा हा काव्याविष्कार निश्चितच सर्वांना प्रेरणादायी ठरेल.
कोकण मराठी साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद अशा साहित्य परिषदेच्या अनेक शाखा या कार्यक्रमामधून सहभागी होत असतात. त्यातून काव्य संमेलने, परिसंवाद असे अनेक कार्यक्रम होत असतात. एकाच विषयाला वाहिलेल्या कविता व कथा क्वचित ऐकायला व अनुभवायला मिळायच्या. संमेलनाचे ते वैशिष्ट्य ठरायचे व त्यातूनच काव्याचा ठसा उमटायचा. गोव्यातील हा प्रयोग नवोदितांसाठी निश्चितच प्रोत्साहन देणारा ठरेल. ना. धों. महानोर यांची अंतरात्मा जागृत करणाऱ्या विदर्भातील दुष्काळ कवितांनी एक काळ विधिमंडळ जागे केले होते. रामदास फुटाणे यांच्या वात्रटिकांनी भल्या भल्या राजकारण्यांना जागे केले होते. पुन्हा या साऱ्याचा परामर्श या संमेलनानिमित्ताने गोव्याला घेतला जाईल. विष्णू सूर्या वाघ यांच्या पुढाकाराने होणारे हे संमेलन यशस्वी तर होईलच मात्र सलग ४८ तास होणाऱ्या या संमेलनात देशभरातील कवी सहभागी होणार आहेत. इतकेच नव्हे; तर गोव्याला जाणाऱ्या रेल्वेच्या एका स्वतंत्र डब्याची व्यवस्थाही या कवींसाठी केली आहे. मधुसूदन नानिवडेकर यांच्यासारख्या ज्येष्ठ कवींचा सहभाग या संमेलनात महत्त्वाचा ठरणार आहे. संमेलनात दिसणारे अनेक कवी या संमेलनातही पाहायला मिळणार आहेत. वेळेचे बंधन नसल्याने काव्य प्रतिभेचा अविष्कार या सादरीकरणातून पाहायला मिळणार आहे. अनेक कवी मोठ्या उत्साहाने यात सहभागी होत आहेत. काव्य क्षेत्रातील नवोदितांना असा एकसुरी सादरीकरणाचा प्रयोग प्रथमच पाहायला व ऐकायला मिळणार आहे. संमेलनांच्या नव्या प्रयोगांमध्ये या काव्य संमेलनाचाही उल्लेख करावा लागेल. देशभरातील महत्त्वाच्या प्रश्नांवर या संमेलनात काव्यामधून प्रकाशझोत टाकला जाईल. त्यातून नवीन विचार पुढे येईल. असेच प्रयोग होत राहिले तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारी काव्यप्रतिभा पुन्हा सतेज होईल. हा दिवस लवकरच पाहायला मिळेल.
- धनंजय काळे