पर्ससिन नौकांमुळे जाळ्यांचे नुकसान

By Admin | Updated: November 16, 2014 00:24 IST2014-11-16T00:17:18+5:302014-11-16T00:24:58+5:30

देवगड बंदर : समस्यांमुळे मच्छिमारांमध्ये नाराजी

Net loss due to Persian boat | पर्ससिन नौकांमुळे जाळ्यांचे नुकसान

पर्ससिन नौकांमुळे जाळ्यांचे नुकसान

देवगड : देवगड समुद्रकिनारी कर्नाटक मलपी येथून आलेल्या शेकडो नौकांसह गोवा, रत्नागिरी व खुद्द देवगडच्याही पर्ससिन नौकांच्या घुसखोरीमुळे येथील पारंपरिक, यांत्रिक मच्छिमारी नौकांच्या जाळ्यांचे अक्षरश: लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
रात्री आठनंतर देवगड समुद्रकिनाऱ्यावरील या पर्ससिन मच्छिमारीचे या मच्छिमारी नौकांवरील लखलखीत व प्रखर दिव्यांमुळे प्रत्यक्ष दर्शनही घेता येत आहे. गेले काही दिवस व रात्री या पर्ससिन नौकांच्या धुमाकुळामुळे देवगडच्या यांत्रिकी नौकांवर राजापूर सागरीनाटे समुद्रामध्ये मच्छिमारी करण्याची वेळ आली आहे. लाखो रुपयांच्या तुटलेल्या जाळ्यांचे नुकसान कोण भरून देणार या सवालासह हे सर्व मच्छिमार आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
देवगड समुद्रकिनारी सुमारे ३०० ते ३५० यांत्रिकी मच्छिमारी नौका, सुमारे २५० च्या वर पाती नौका व पारंपरिक होड्या मच्छिमारी करतात. सध्या मच्छिचा तुटवडाच आहे. त्यात खोल समुद्रात परप्रांतीय मच्छिमारी नौका व त्यांना साथ देणाऱ्या स्थानिक पर्ससिनधारक मच्छिमारी नौका यांची भरमसाठ मच्छिमारी सुरु आहे. त्या नौकांवरील मच्छिमार दररोज रात्री देवगड बाजारपेठेमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. मात्र, याबाबतीत स्थानिक मत्स्य विभाग, बंदर विभाग व अन्य संबंधित प्रशासकीय यंत्रणा कोणतीही कारवाई करताना दिसत नसल्याची तक्रार स्थानिक मच्छिमार करीत आहेत.
सध्या पारंपरिक मच्छिमारी क्षेत्रामध्ये पर्ससिन मच्छिमारांची भाऊगर्दी झालेली आहे. या पर्ससिनधारक नौका स्थानिक मच्छिमारांच्या नौकांपेक्षा आधुनिक व जास्त इंजिन क्षमतेच्या आहेत. या नौकांवरील खलाशी संख्याही मोठी असते.
त्यामुळे हे सर्व पर्ससिनधारक दंडेलशाही करून यांत्रिक मच्छिमारांच्या क्षेत्रातील नौकांची जाळी तोडून व खलाशांना दमदाटी करून मच्छिमारीमध्ये गुंतले असल्याचा आरोप स्थानिक यांत्रिक नौकाधारकांनी केला आहे. प्रत्येक नौकेवरील जाळ्यांची किंमत ४० ते ४५ हजारांच्या वर असते. अशा शेकडो नौकांची ही अवस्था आहे. त्यांच्या जाळ्यांची सातत्याने होणारी नासधूस कित्येक लाख रुपयांच्या घरात पोचली आहे. शिवाय जाळी तुटल्यामुळे पकडलेली मच्छि निसटून जाण्यामुळे होणारी नुकसानी वेगळी आहे. नौकांच्या इंजिन व इतर यंत्रणेचेही नुकसान काही ठिकाणी झाल्याचे या नौकाधारकांचे म्हणणे असून शिवाय या नौकांवरील खलाशी भयभीत झाल्याने किनाऱ्यावर येवून पुन्हा मूळ गावी परतण्याची भितीही नौकामालकांना वाटत आहे. या सर्वावर स्थानिक पोलीस यंत्रणा, तहसील व महसूल यंत्रणा यासह मत्स्य विभागाने त्वरित कठोर कारवाई करून या पर्ससिनधारक नौकांना पायबंद घालावा. अन्यथा स्थानिक मच्छिमारांमध्ये संतापाचा उद्रेक होऊ शकेल, असा इशाराही देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Net loss due to Persian boat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.