भेकुर्लीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
By Admin | Updated: September 11, 2014 00:02 IST2014-09-10T22:31:35+5:302014-09-11T00:02:11+5:30
पालकमंत्र्यांनी दत्तक घेतलेले गाव : रस्त्यावरील दरड काढण्यात अपयश

भेकुर्लीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
शिरीष नाईक - कसई दोडामार्ग --तळकट-भेकुर्ली रस्त्यावर ठिकठिकाणी दरड कोसळून मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे भेकुर्ली, खडपडे, कुंभवडे आदी ठिकाणच्या ग्रामस्थांना डोक्यावर सामान घेऊन पायी प्रवास करावा लागत आहे. गणेश चतुर्थीच्या कालावधीत तरी हा रस्ता वाहतुकीस मोकळा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. याबाबत बांधकाम विभागालाही कल्पना देण्यात आली. परंतु बांधकाम विभागाच्या निष्काळजी धोरण आणि जिल्हा परिषद सदस्यांचा बेजबाबदारपणा यामुळे रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’ असून वाहतूक पूर्णपणे बंद आहे.
पालकमंत्री नारायण राणे यांनी दत्तक म्हणून घेतलेल्या या गावाकडे बांधकाम विभागाने मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. हा रस्ता तातडीने वाहतुकीस मोकळा करून ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.
तळकट-भेकुर्ली हा जिल्हा परिषद अंतर्गत कच्चा रस्ता असला, तरी परिसरातील ग्रामस्थ व वाहनधारकांना वाहतुकीसाठी सोयिस्कर आहे. परंतु यावर्षीच्या पावसाळ्यात या रस्त्यावर ठिकठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. दरड कोसळून वाहतूक ठप्प झाल्याने रस्ता बंद होऊन लांब अंतराच्या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला.
तसेच काही ठिकाणी रस्ता पूर्ण खचल्याने भेकुर्ली, कुंभवडे, खडपडे आदी गावातील ग्रामस्थांना पायी प्रवास करावा लागत आहे. या घटनेला आता दीड महिना लोटला असून वृत्तपत्रांतूनही याबाबत वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. परंतु बांधकाम विभाग किंवा जिल्हा परिषद सदस्यांनी याची कोणतीही दखल घेतली नाही.
गणेश चतुर्थी असल्याने रस्ता मोकळा केला जाईल, अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती. परंतु या सणालाही बांधकाम विभागाने महत्त्व दिले नाही. त्यामुळे गणेशोत्सवाच्या कालावधीत डोक्यावर सामान घेऊन भर पावसात सुमारे १२ किलोमीटर अंतर ग्रामस्थांना पार करावे लागले. यामुळे ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या मार्गावर प्रवास करताना कधी कधी तर ओहोळाच्या पाण्याचे वाढलेले पाणी ओसरेपर्यंत ग्रामस्थांना वाट पहावी लागते. त्यामुळे तळकट-भेकुर्ली रस्ता तातडीने वाहतुकीस मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.
दयनीय अवस्था
पालकमंत्री नारायण राणे यांनी भेकुर्ली गाव दत्तक घेतले आहे. मात्र, या गावची अवस्था अजूनही दयनीय आहे. दळणवळणाची कोणतीही व्यवस्था नसल्याने हे गाव अद्याप मागासलेले राहिले आहे. त्यामुळे तळकट ते भेकु र्ली या रस्त्यावरील मोऱ्या नव्याने बांधण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी करून मोऱ्या मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत एकही मोरी बांधण्यात आली नाही. त्यामुळे जीव धोक्यात घालून
ग्रामस्थांना प्रवास करावा लागत आहे.