अपघात वाढताहेत चिंतनाची गरज
By Admin | Updated: July 18, 2014 22:55 IST2014-07-18T22:49:26+5:302014-07-18T22:55:47+5:30
वाहनचालकांमध्ये जागृतीची आवश्यकता

अपघात वाढताहेत चिंतनाची गरज
गजानन बोंद्रे : साटेली भेडशी
सद्यस्थितीत रस्त्यांवरील अपघात आणि त्यात मृत्यू पावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या सर्वांना जबाबदार कोणी एखादा घटक नसून त्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. ज्याप्रमाणे शहरात वाहनांची संख्या बेसुमार वाढत आहे, त्याचप्रमाणे ग्रामीण भागातही वाहनांच्या संख्येत फार मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत वाढ होते. मात्र, चांगल्या रस्त्यांअभावी व वाहनचालकांच्या बेजबाबदारपणांमुळे अपघात वाढले आहेत. यासाठी वाहनचालकांमध्ये जागृती व बांधकाम विभागाने रस्त्यांच्या सुधारणेवर लक्ष दिल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल.
भेडशी आणि परिसरात रस्ता अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दिवसेदिवस वाढत जाणारी वाहनसंख्येमुळे वाहनचालकांचा बेजबाबदारपणा वाढलेला आहे. मोठ्या प्रमाणात वाढणारी वाहने आणि त्यांना लागणाऱ्या सोयीची किंवा रस्त्यांमध्ये सुधारणा न होणे यामुळे अपघातात वाढ होत आहे.
या परिसरातील रस्ते अरुंद आणि वळणावळणाचे असल्याने अनेकवेळा वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. तसेच समोरच्या परिस्थितीचा अंदाज न आल्याने अपघात घडतात. ज्या प्रमाणात वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे, त्याप्रमाणात रस्त्यांच्या विकासात आणि सोयीसुविधांमध्ये वाढ होणे फार महत्त्वाचे आहे. रस्त्यांना पडलेले खड्डे, खचलेली बाजूपट्टी, दोन्ही बाजूंना वाढलेली झाडी यावर संबंधित विभागाने केलेल्या दुर्लक्षामुळे अपघातांची संख्या वाढत आहे. भेडशी परिसरातील काही रस्त्यांचे डांबरीकरण पावसापूर्वी झालेले असले, तरी काही रस्ते अजूनही डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. या रस्त्यांवर सध्या मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. अनेक ठिकाणच्या मोऱ्या खचलेल्या स्थितीत आहेत. अनेक ठिकाणच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूची झाडी मोठ्या प्रमाणात वाढल्याने या परिसरातील अपघातांमध्ये वाढ झाली आहे. रस्त्याशेजारील जुनाट व जीर्ण झालेली झाडे वारा-पाऊस यामुळे उन्मळून रस्त्यावर पडून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाचे अशा गोष्टींवर बारीक लक्ष असणे महत्त्वाचे आहे.
या परिसरात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात झाली असून त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारही झालेला दिसून येतो. रस्त्याच्या बांधणीसाठी किंवा दुरुस्तीसाठी आलेला खर्च त्या रस्त्यांच्या बांधणी किंवा दुरुस्तीसाठी पूर्ण खर्च केला जात नाही. त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने रस्त्यांच्या टिकाऊपणाबाबत साशंकता निर्माण होते. अशा रस्त्यांना अल्पावधीतच मोठे खड्डे पडतात. अनेक ठिकाणचा रस्ता वाहून जातो. त्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ होते. तसेच पूर्णपणे खराब झालेल्या रस्त्यांचे योग्यवेळी डांबरीकरण होणे गरजेचे आहे. सध्या दोडामार्ग ते वीजघर, बोडदे ते खोक्रल, झरेबांबर ते उसप, भेडशी ते घोटगेवाडी, केर, हे सर्व रस्ते पूर्णपणे खराब झालेले असून त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
काहीवेळा अपघातांना चालकांचा बेजबाबदारपणाही कारणीभूत ठरतो. अनेक वेळा वाहनचालक कोणतेही नियम पाळत नाहीत. भेडशी परिसर हा ग्रामीण भाग असल्याने अनेक वेळा लहानमोठे अपघात या परिसरात घडलेले आहेत. काही वाहनचालक खूपच घाईगडबडीत असल्याप्रमाणे वाहने हाकतात आणि बाजारपेठेसारख्या गर्दीच्या ठिकाणी अपघात होतात.
अपघात टाळावयाचे असतील, तर प्रत्येकाने आपापली जबाबदारी योग्य रितीने पार पाडणे आवश्यक आहे. प्रत्येक वाहनचालकाने सर्व नियमांचे योग्य पालन केले पाहिजे. जेणेकरून अपघात घडणार नाहीत. जिल्हा परिषद, बांधकाम विभाग अधिकाऱ्यांनी रस्त्यांची डागडुजी व बांधणीकडे काटेकोरपणे लक्ष ठेवून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करणे गरजेचे आहे. वाहनचालकांनी योग्य ती खबरदारी घेत गाडीवर आणि वेगावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी, रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती आदी खबरदारी बाळगल्यास अपघातांच्या संख्येत बऱ्याच प्रमाणात घट होण्यास मदत होणार आहे.