व्यापाऱ्यांच्या ताकदीची दखल आवश्यक : शिंदे
By Admin | Updated: February 2, 2015 00:16 IST2015-02-01T23:13:51+5:302015-02-02T00:16:07+5:30
सुनील सौदागर यांनी सद्यस्थितीत ई-शॉपिंगचे प्रमाण वाढत असल्याने व्यापारात संकट निर्माण झाले आहे. परंतु व्यापाऱ्यांनी न डगमगता भविष्याचा वेध घेत पूर्वापार व्यवसायाला कल दिला पाहिजे,

व्यापाऱ्यांच्या ताकदीची दखल आवश्यक : शिंदे
वेंगुर्ले : बदलत्या काळातही व्यापाऱ्यांनी आज एकत्र येऊन आपली ताकद दाखविली. ही उल्लेखनीय बाब आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या या एकतेची दखल घेणे आवश्यक असल्याचे मत गृह, पणन, पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे यांनी जिल्हा व्यापारी महासंघाच्या वेंगुर्ले येथे आयोजित केलेल्या मेळाव्याप्रसंगी व्यक्त केले. सिंधुुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या २७ व्या वर्धापनदिनानिमित्त व्यापारी एकता मेळावा यावर्षी वेंगुर्ले येथे आयोजित करण्यात आला होता. या व्यापारी मेळाव्याचे उद्घाटन उद्योगपती यशवंत उर्फ बाप्पा मांजरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री दीपक केसरकर, चेंबर आॅफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष रामभाऊ भोगले, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजय वळंजू, वेंगुर्ले व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर, सारस्वत बँकेचे संचालक सुनील सौदागर, नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल, जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह महेश नार्वेकर, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे उपाध्यक्ष समीर दुधगावकर, अमित कामत, आशिष पेडणेकर, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स युवा विभागाच्या अध्यक्षा नेहा खरे, पंचायत समिती सभापती सुचिता वजराठकर, स्वागताध्यक्ष अनिल सौदागर, वेंगुर्ले व्यापारी संघाचे कार्यवाह पंकज शिरसाट आदी उपस्थित होते. सुनील सौदागर यांनी सद्यस्थितीत ई-शॉपिंगचे प्रमाण वाढत असल्याने व्यापारात संकट निर्माण झाले आहे. परंतु व्यापाऱ्यांनी न डगमगता भविष्याचा वेध घेत पूर्वापार व्यवसायाला कल दिला पाहिजे, असे सांगून व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्याबाबत केसरकर यांना आवाहन केले. व्यापाऱ्यांनी खंबीरपणे काम केल्याने ई-शॉपिंगचा जास्त परिणाम होणार नाही, असे मत चेंबर आॅफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष रामभाऊ भोगले यांनी व्यक्त केले. पालकमंत्री केसरकर यांनी, व्यापाराकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. जिल्ह्याची भरभराट झाल्यास व्यापाऱ्यांचीही उन्नती होईल, असे सांगून काजू नुकसानीचा परतावा लवकरच दिला जाईल, असे आश्वासन दिले. या मेळाव्याला माजी आमदार राजन तेली, प्रमोद जठार, माजी जिल्हा परिषद सभापती काका कुडाळकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, उद्योजक दादासाहेब परूळकर, जिल्हा युथचे अध्यक्ष श्रीनिवास गावडे यांनी उपस्थित राहून व्यापाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. वेंगुर्लेचे ज्येष्ठ व्यापारी काका खानोलकर यांचा पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सिंंधुदुर्ग व्यापारी संघाचे अध्यक्ष विजय वळंजू यांनीही मनोगतातून समस्या मांडल्या. सूत्रसंचालन अॅड. सूर्यकांत प्रभूखानोलकर, आभार अनिल सौदागर यांनी मानले. (प्रतिनिधी)
व्यापारी हा शासनाचा जास्त महसूल देणारा घटक आहे. सरकारचे छोटी बंदरे विकसित करून प्रदूषण विरहीत वाहतूक केल्यास त्याला व्यापाऱ्यांचा विरोध होणार नाही. नवीन सरकारकडून व्यापाऱ्यांच्या समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे सरकारने व्यापाऱ्यांच्या प्रश्नांबाबत तातडीने लक्ष घालून त्या मार्गी लावाव्यात, असे बाप्पा मांजरेकर यांनी सांगितले. वेंगुर्ले नगराध्यक्ष प्रसन्न कुबल यांनी व्यापाऱ्यांच्या ताकदीचा उपयोग वेंगुर्लेच्या विकासातही करून घेणार असल्याचे सांगितले.