नियोजनबद्ध विकासासाठी आराखड्याची गरज
By Admin | Updated: October 8, 2015 00:33 IST2015-10-07T23:48:31+5:302015-10-08T00:33:24+5:30
विद्याधर देशपांडे : कणकवलीत विकास आराखड्याबाबत मार्गदर्शन

नियोजनबद्ध विकासासाठी आराखड्याची गरज
कणकवली : दिवसेंदिवस महाराष्ट्रात शहरीकरणाचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांना पायाभूत सुविधा पुरविताना प्रशासनाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा स्थितीत शहराचा सर्वांगीण तसेच नियोजनबद्ध विकास व्हायचा असेल तर विकास आराखड्याची नितांत गरज आहे, असे मत महाराष्ट्र राज्याचे नगर विकास विभागाचे माजी संचालक विद्याधर देशपांडे व्यक्त केले.येथील नगरवाचनालयाच्या पू. आप्पासाहेब पटवर्धन सभागृहात बुधवारी डॉ. पी. व्ही. मंडलिक ट्रस्ट आणि कणकवली नगरपंचायतीच्यावतीने नगर विकास आराखडा लोकजागृती विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. पी. व्ही. मंडलिक ट्रस्टच्या विश्वस्त निला पटवर्धन, विकास आराखडा विषयाचे अभ्यासक गजानन खातू, रमाकांत पाटील, अॅड. सुरेखा दळवी, अर्पिता मुंबरकर, हरिहर वाटवे, नगराध्यक्षा अॅड. प्रज्ञा खोत, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्यासह अन्य नागरिक व नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी विद्याधर देशपांडे म्हणाले की, गेल्या ५० ते ६० वर्षात शहरात राहणाऱ्यांची संख्या २० टक्क्यांवरून ५० टक्क्यांवर पोहोचली आहे. त्यामुळे शहराचा कारभार करणाऱ्या नगरपंचायतीसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर नागरिकांना पायाभूत सुविधा पुरविताना अतिरिक्त ताण येत आहे. रहदारीसाठी रस्त्यांची संख्या कमी पडत आहे. प्रदूषणाबरोबरच रस्त्यांवरील अपघातांची संख्या वाढली आहे. अशा स्थितीत सामान्य जनतेला सुविधा पुरविणे सुलभ व्हावे यासाठी शहर विकास आराखड्याची गरज आहे. हा आराखडा बनविण्याची महत्वाची जबाबदारी नगरपंचायतीवर असते.
त्यांनी ही जबाबदारी पार पडली नाही तर शासन जनहिताच्या भूमिकेतून नगरपंचायतीचे अधिकार काढून घेऊन आपण ते काम करू शकते. पुणे तसेच इतर ठिकाणी असे घडले आहे.
कणकवली शहराचा परिपूर्ण विकास आराखडा तयार करायला सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. हा आराखडा तयार करताना नागरिकांनी सतर्क राहून आपल्या हरकती नोंदवायला हव्यात. शहरातील सामाजिक संस्थांनीही त्यासाठी पुढाकार घ्यावा असेही ते म्हणाले.
अॅड. सुरेखा दळवी म्हणाल्या, संपूर्ण देशातील राज्यांमध्ये शहरीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. ग्रामीण भागातही छोटी शहरे साकारत आहेत. मात्र, नियोजनाअभावी शहरांच्या बकालपणात वाढ होत आहे. त्यामुळे शहरांचे अभ्यासपूर्ण विकास आराखडे तयार करणे गरजेचे आहे. गजानन खातू, रमाकांत पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन पद्मावती गुप्ते यांनी केले. निला पटवर्धन यांनी डॉ. मंडलिक ट्रस्टच्या कार्याची ओळख उपस्थितांना करून दिली तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत तुकडोजी महाराज रचित गीत लीला आपटे यांनी सादर केले. यावेळी काही नागरिकांनी प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
नगराध्यक्षा अॅड. प्रज्ञा खोत यांनी कणकवली शहराचा परिपूर्ण विकास आराखडा बनविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी केले. (वार्ताहर)
नुकसानीची भीती नको
शहर विकासासाठी आपली जागा घेतली जाईल. जागेवर आरक्षण पडेल आणि आपले नुकसान होईल अशी भीती अनेक नागरिकांना असते.
मात्र, शासनाने नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे जागा मालकांनी घाबरण्याचे कारण नाही.
नागरिकांचा विरोध टाळण्यासाठी लँड पुलिंग टेक्निकसारख्या पद्धती अलिकडे विकास प्रकल्पासाठी जागा घेताना वापरल्या जातात.
त्याचा सर्वच नागरिकांना फायदा होतो. गुजरातसारख्या राज्यात तर लोकांकडून टाऊन प्लॅनिंगचे स्वागत करण्यात येत असल्याचेही विद्याधर देशपांडे म्हणाले.