हिपॅटायटिस रोखण्यासाठी सुसंवादाची आवश्यकता

By Admin | Updated: August 1, 2014 23:17 IST2014-08-01T21:14:44+5:302014-08-01T23:17:41+5:30

प्रसाद साळगावकर : शिरोडा येथील चर्चासत्रात मार्गदर्शन

Need for Communication with Hepatitis | हिपॅटायटिस रोखण्यासाठी सुसंवादाची आवश्यकता

हिपॅटायटिस रोखण्यासाठी सुसंवादाची आवश्यकता

शिरोडा : सर्व प्रकारच्या हिपॅटायटिसचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावीपणे माहिती व शिक्षण तसेच सुसंवादाची गरज आहे. हिपॅटायटिसबद्दल शास्त्रीय माहिती जाणून घेऊन राहणीमानात सकारात्मक बदल करुन वेळेवर निदान झाल्यास योग्य काळजी घेतल्यास प्रत्येक रुग्णाला बचाव करणे शक्य आहे, असे प्रतिपादन शिरोडा येथील डॉ. प्रसाद साळगावकर यांनी केले.
जागतिक हिपॅटायटीस विरोधी दिनाचे औचित्य साधून गणेश क्लिनिक शिरोडा यांच्यावतीने आयोजित केलेल्या हिपॅटायटिस धोका ओळखा, या मार्गदर्शनपर चर्चासत्रात डॉ. साळगावकर बोलत होते. डॉ. साळगावकर पुढे म्हणाले, संसर्गजन्य रोगांपैकी एचआयव्ही, टीबी, मलेरिया या रोगांची ज्याप्रमाणे जगजागृती झाली आहे. त्याच धर्तीवर जगातील आठव्या क्रमांकाचा आजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिपॅटायटिसबद्दल अद्यापही हवी त्या प्रमाणात जनजागृती झालेली नाही. पावसाळ्यात काविळीचे प्रमाण वाढते. अस्वच्छता, पाण्याचे कृत्रिम साठे, दूषित अन्नपदार्थ, उघड्यावरील व कच्चे अन्न यांचे सेवन, मद्यपान आदी कारणांमुळे काविळीची लागण होते. काविळीचा हा विषाणू आतड्यातील पेशींमध्ये प्राथमिक वाढ करतो. व त्यानंतर रक्ताव्दारे तो विषाणू यकृतातील पेशींवर हल्ला करुन यकृत दूषित करतो. हिपॅटायटिसचे सहा विषाणू असतात. मात्र, प्रत्येकवेळी सगळ्याच प्रकारच्या काविळीची प्राथमिक लक्षणे दिसून येत नाहीत. या आजारावरील प्रभावी लस बाजारात उपलब्ध असून त्याच्या सहाय्याने हा रोग आटोक्यात आणता येतो, असेही साळगावकर यांनी सांगितले. सध्या पावसात हिपॅटायटिसचे अनेक रुग्ण आढळतात. त्यांच्यावर गावठी उपचार न करता वेळीच डॉक्टरांशी सल्लामसलत केली गेल्यास काविळ आटोक्यात येऊ शकते. त्यामुळे वेळीच वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन साळगावकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Need for Communication with Hepatitis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.