रायझिंग हाऊस उभारणे गरजेचे : शरद पवार
By Admin | Updated: May 15, 2014 00:29 IST2014-05-15T00:28:29+5:302014-05-15T00:29:51+5:30
सिंधुदुर्गनगरी : परदेशात येथील हापूस आंब्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली. यामागची कारणे शोधली पाहिजेत. याचा अभ्यास केला असता

रायझिंग हाऊस उभारणे गरजेचे : शरद पवार
सिंधुदुर्गनगरी : परदेशात येथील हापूस आंब्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली. यामागची कारणे शोधली पाहिजेत. याचा अभ्यास केला असता प्रकर्षाने जाणवते की फळांवर प्रक्रिया करण्यासाठी रायझिंग हाऊस (फळांची काळजी घेणारे केंद्र) आपल्याकडे नाही. तसेच पॅकींग हाऊसही नाही. त्यामुळे या दोन्ही गोष्टींची गरज आपल्याला आहे. आंबा उत्पन्नाबाबत काळजी घेतल्यास भविष्यात अशी परिस्थिती आपल्यावर ओढवणार नाही. असे मत केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिंधुदुर्गनगरीमध्ये बोलताना व्यक्त केले. सिंधुदुर्गात कृषी भवनाची उभारण्यात आलेली वास्तू एखाद्या पंचतारांकीत हॉटेलप्रमाणे आहे. महाराष्ट्रात कुठेही अशी वास्तू नाही. या वास्तूमध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन होण्यासंबंधी संधी निर्माण केल्या पाहिजेत. ही वास्तू सतत गजबजलेली असली पाहिजे. हे केंद्र लोकोपयोगी होण्यासंबंधी काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी सर्वांनी एकत्र मिळून बसून नियोजन केले पाहिजे, असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले. राष्ट्रवादीचे सरचिटणीस कै. अॅड. गुरूनाथ कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गनगरी येथे साकारलेल्या शरद कृषी भवनाचे उद्घाटन झाल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, कोकणचा प्रदेश हा निसर्गसौंदर्याने भरलेला आहे. येथील काजू, आंबा, नारळ, कोकम या फळबागासंबंधी प्रश्न सोडविण्याचा आपला कायमच मानस राहिला आहे. त्यासाठी तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येईल. मत्स्य व्यवसायासाठी खाडीजवळील जागा घेवून त्यात कोळंबी शेती करता येईल. वास्तूचे रूपांतर कृषी माहिती केंद्रात व्हावे शरद कृषी भवनाची भव्य वास्तू उभारण्यात आली आहे. मात्र, नुसती वास्तू उभारून चालणार नाही. तर तिचे रूपांतर कृषी माहिती केंद्र म्हणून झाले पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येवून पुढच्या कार्यक्रमाची दिशा आखूया. असे आवाहनदेखील पवार यांनी यावेळी केले. शेतीक्षेत्रात आमूलाग्र बदल गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत आपण कृषीमंत्री झाल्यानंतर देशाच्या शेतीक्षेत्रात आमुलाग्र बदल झाले. गेल्यावर्षी २५९ दशलक्ष टन धान्याची विक्रमी निर्मिती झाली. यावर्षी यात आणखीन भर पडून हा आकडा २६४.३८ दशलक्ष टन एवढा झाला. गहू, तांदूळ, डाळ, कापूस तसेच प्रत्येक गोष्टीमध्ये विक्रमी उत्पादनामध्ये भारत पहिल्या क्रमांकाचा देश बनला. तांदूळ निर्यात करण्यामध्ये भारत हा देश जगातील पहिल्या क्रमांकाचा देश बनला तर गहू, साखर, कापूस यामध्ये जगातील दोन क्रमांकाचा देश बनला. त्याचप्रमाणे फळबागांची निर्मिती, फळांची निर्मिती यामध्येही जगात भारताचा प्रथम क्रमांक लागतो. मात्र, मार्केटींग करण्यामध्ये आपण मागे पडत आहोत, अशी खंत पवार यांनी व्यक्त केली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग देशातील आदर्श जिल्हे आपण कृषीमंत्री झाल्यावर कर्जमाफीचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा फायदा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या देशातील दोनच जिल्ह्यांना झाला नाही. कारण या जिल्ह्यात शेतकर्यांनी घेतलेली कर्ज ते प्रामाणिकपणे परत करतात. येथील लोक ठकवाठकवी करत नाहीत. घेतलेले कर्ज व्याजासहीत परत देण्याची कोकणी माणसाची प्रवृत्ती वाखाणण्याजोगी आहे.