लेप्टोच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना सुरू
By Admin | Updated: June 12, 2015 00:48 IST2015-06-11T21:35:43+5:302015-06-12T00:48:49+5:30
अनिरूद्ध आठल्ये : जनतेने खबरदारी घेण्याचे आवाहन

लेप्टोच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना सुरू
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात लावणी व भात कापणी हंगामात लेप्टोस्पायरोसीस सदृश तापाचे रुग्ण आढळून येतात. या रोगाच्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य यंत्रणेद्वारे आवश्यक त्या उपाययोजना सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांनी दिली.
डॉ. आठल्ये म्हणाले, या रोगाचा प्रसारबाधित प्राणी (मुख्यत्वे उंदिर, घुशी, डुक्कर, गाई, म्हशी, मांजर, कुत्री) यांच्या लघवीवाटे लेप्टोस्पायरोसीस जंतू बाहेर पडत असतात. बाहेर पडलेल्या जंतूंचा माणसाच्या त्वचेशी संपर्क आल्यास या रोगाचा प्रादुर्भाव होतो. तसेच अशा जंतूंमुळे दूषित झालेले पाणी किंवा भाज्या यांच्याशी संपर्क आल्यास व त्वचेवर जखम असल्यासही हा रोग होऊ शकतो.
या रोगाचे निदान रक्त व लघवी याची तपासणी करून करता येते. जिल्ह्यात संशयित तापाच्या रुग्णांच्या रक्ताची व लघवीची तपासणी करून निदान करण्याची सोय जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गनगरी येथे उपलब्ध आहे. तसेच आवश्यकतेनुसार ज्या रुग्णास संदर्भित करावयाचे असल्यास जीएमसी गोवा व सीपीआर कोल्हापूर येथे दरवर्षी १ जुलै ते ३१ डिसेंबर या कालावधीत विशेष मदत कक्षाची स्थापना करण्यात येते. तरी जिल्ह्यातील जनतेने याबाबत सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
...या सूचनांचे पालन करा
लेप्टोस्पायरोसीस सदृश तापाबाबत जिल्ह्यातील जनतेने घ्यावयाची खबरदारी म्हणून पुढील सूचनांचे पालन करावे. यात आपल्या घरात अगर शेजारी तीव्र ताप, अंगदुखी, थंडी वाजणे, तीव्र स्नायू वेदना, लघवी पिवळी होणे अशा लक्षणांचा रुग्ण आढळल्यास अशा रुग्णास त्वरित नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालय येथे उपचार घेण्यास प्रवृत्त करावे.
बऱ्याचवेळा रुग्णांची लक्षणेही किरकोळ स्वरूपाची व न समजून येणारी असतात. त्यामुळे किरकोळ ताप असल्यास अंगावर तोलू नये. उपचारासाठी त्वरित प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल व्हावे.
ज्या व्यक्तींच्या हातापायावर जखम किंवा खरचटलेले असल्यास अशा व्यक्तींची दूषित पाणी, दूषित माती तसेच साचलेले पाणी यांच्याशी संपर्क टाळावा.
रबरी बूट व हातमोजे वापरावे. जनावरांच्या मलमूत्राशी सरळ संपर्क टाळावा. भातशेतीच्या हंगामात काम करणाऱ्या व्यक्तींनी अंगावर जखम असल्यास जखमेला बॅन्डेज करावे.
शेतात भात कापणी करणाऱ्या व्यक्तींनी शक्य असल्यास रबरी बूट व हातमोजे वापरावेत. पाळीव प्राणी, मांजर, कुत्रा यांच्याशी जवळीकता टाळावी.
घरातील व घराशेजारील परिसर स्वच्छ राखावा. उंदीर, घुशी यांचा नायनाट करावा.
लेप्टोस्पायरोसीसची लक्षणे आढळल्यास नजीकच्या आरोग्यसंस्थेशी संपर्क
साधावा.