बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची ‘मोहर’?
By Admin | Updated: September 25, 2014 00:21 IST2014-09-24T22:47:49+5:302014-09-25T00:21:58+5:30
रत्नागिरी विधानसभा : लोकसभेच्या पुनरावृत्तीची भाजपला संधी

बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची ‘मोहर’?
प्रकाश वराडकर -रत्नागिरी -जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांची २००९मध्ये पुनर्रचना झाली, अन रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा भूगोलही बदलला. तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गटांमध्ये संगमेश्वर तालुक्यातील नावडी हा गट समाविष्ट झाला. त्यामुळे युतीचे प्राबल्य मतदारसंघात अधिक वाढले. परंतु ते जिल्हा परिषद व पंचायत समितीपुरतेच सीमित राहिले. २००५ व २००९ च्या विधानसभा निवडणुकीत युतीच्या या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीने विजय संपादन करून राजकीय चमत्कार घडविला. भूगोल युतीच्या बाजूने असतानाही इतिहास बदलण्याचा चमत्कार कसा घडला, याचीच चर्चा होत राहिली. या निवडणुकीत विधानसभेच्या बदललेल्या भूगोलावर राष्ट्रवादीची मोहर पुन्हा उमटणार की, लोकसभा निवडणुकीतील युतीच्या मताधिक्याची पुनरावृत्ती होऊन राष्ट्रवादीला धक्का बसणार, याकडेच आता जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ अनेक वर्षांपासून रत्नागिरी तालुक्यापुरताच मर्यादित होता. मात्र, २००९मध्ये जिल्ह्यातील मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली. त्यात संगमेश्वर तालुका लांजा-राजापूर, चिपळूण व रत्नागिरी मतदारसंघात विभागला गेला. संगमेश्वर तालुक्याच्या खाडीपट्ट्यातील नावडी जिल्हा परिषद गट रत्नागिरी मतदारसंघात समाविष्ट झाला. त्यामुळे पूर्वीच्या आठऐवजी या मतदारसंघात जिल्हा परिषद गटांची संख्या ९ झाली. समाविष्ट झालेला नावडी गट सेनेचाच बालेकिल्ला असल्याचे २०१२च्या जिल्हा परिषद निवडणुकीत स्पष्ट झाले. मतदारसंघाचा भूगोल बदलल्यानंतरही जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राजकीय वर्चस्व युतीचेच राहिले.
नावडी गटही सेनेच्याच वर्चस्वाखाली आला. त्यामुळे या मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या ९ गटांपैकी वाटद हा एकच गट राष्ट्रवादीने जिंकला. तेथे प्रसाद ऊर्फ बाबू पाटील विजयी झाले. पावस गटात बहुजन विकास आघाडीने राष्ट्रवादीची मदत घेतली.
त्यामुळे नंदकुमार मोहिते यांनी विजय मिळविला. याव्यतिरिक्त आघाडीला या विधानसभा मतदारसंघात अन्य गटांवर वर्चस्व मिळविता आले नाही. अन्य सातही जिल्हा परिषद गटांवर सेना-भाजपा युतीने वर्चस्व प्रस्थापित केले.
त्यातील हातखंबा, नाचणे, गोळप व संगमेश्वर तालुक्यातील परंतु रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील नावडी गटातही सेनेनेच विजयाचा झेंंडा राजेश मुकादम यांच्या विजयाच्या रुपाने फडकावला. हातखंबा गटात उदय बने, नाचणे गटात विनया गावडे, गोळप गटात देवयानी झापडेकर सेनेच्या शिलेदारांनी विजय संपादन केला. करबुडे गटात शुभांगी देसाई, कोतवडे गटात सतीश शेवडे, शिरगाव गटात विजय सालीम हे भाजपा उमेदवार जिंकले. नऊपैकी तब्बल सात गटात युतीचे वर्चस्व असतानाही युतीचा येथील उमेदवार विजयी होऊ शकला नाही.
गेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत युतीच्या या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा आमदार निवडून आला. त्यामुळे मतदारसंघाचा भूगोल बदलूनही विधानसभेच्या विजयाचा गड गेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये युतीला सर करता आला नाही, हा चमत्कारच मानला जात आहे. मात्र, या चमत्कारामागे युतीतीलच काहींचा नमस्कार असल्याची चर्चा गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये होती.
लोकसभा निवडणुकीत विधानसभेप्रमाणे चमत्कार घडला नाही. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीतील युतीच्या यशाची पुनरावृत्ती या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी मतदारसंघात होणार की पुन्हा राष्ट्रवादीच आपला राजकीय करिश्मा दाखविणार, याबाबत आता सर्वांनाच उत्कंठा आहे. घोडामैदान जवळ आहे. येत्या दोन दिवसांनंतर निवडणूक अश्व चौखूर उधळणार आहेत. निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना आता १५ आॅक्टोबरच्या मतदानाची व त्यानंतर १९ आॅक्टोबर २०१४ रोजी होणाऱ्या मतमोजणीतील निकालाची प्रतीक्षा आहे.