कणकवली मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा
By Admin | Updated: August 13, 2014 23:31 IST2014-08-13T21:36:06+5:302014-08-13T23:31:42+5:30
रत्नागिरीत पक्षश्रेष्ठींची भेट; देवगडमधील बैठकीतही कार्यकर्ते आग्रही

कणकवली मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा
वैभववाडी : गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दिला गेलेला कणकवली-देवगड-वैभववाडी मतदारसंघ पूर्ववत राष्ट्रवादीलाच मिळावा, अशी मागणी मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याकडे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पूर्वीचा देवगड मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होता. २००९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या मतदारसंघाची पुर्नरचना होऊन कणकवली-देवगड-वैभववाडी असा मतदारसंघ तयार झाला. परंतु काँग्रेसने या मतदारसंघाचा आग्रह गेल्या निवडणुकीत धरला. त्याचवेळी राष्ट्रवादीला सावंतवाडी मतदारसंघ हवा होता. त्यामुळे दोन्ही पक्षांची सोय करण्याच्या उद्देशाने मतदारसंघांची अदलाबदल करण्यात आली होती. परंतु काँग्रेसचा उमेदवार या मतदारसंघात पराभूत झाल्याने परंपरागत मतदारसंघ पुन्हा राष्ट्रवादीला मिळावा, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.
पक्षाचे ज्येष्ठ नेते नंदूशेठ घाटे, माजी जिल्हाध्यक्ष बाळा भिसे, आप्पा अनभवणे, विनायक जोईल, प्रफुल्ल सुद्रीक, अजय चिके, संभाजी रावराणे, बंटी कदम, सुधीर मांजरेकर, महेश रावराणे, चंदू परब, अविनाश सापळे, रंजन चिके, संतोष बोडके आदींनी सोमवारी रत्नागिरीत पक्षनेतृत्वाची भेट घेऊन मतदारसंघावर दावा केला. त्याचवेळी गेल्या २ वर्षापासून काँग्रेस सातत्याने सावंतवाडी मतदारसंघावर दावा करीत असल्याचे पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आणून दिले.
माजी आमदार केसरकर पक्ष सोडून गेल्याने त्यांच्यासमवेत त्या मतदारसंघातील बहुतांश कार्यकर्ते शिवसेनेत गेले. मात्र कणकवली मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते पक्षातच थांबल्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीची स्थिती अधिक चांगली असल्याचे या कार्यकर्त्यांनी पक्ष नेतृत्वाला पटवून दिले आहे.
त्यामुळे याबाबत आता पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात याकडे सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले
आहे. (प्रतिनिधी)