वेंगुर्लेतील राष्ट्रवादीचे १२ नगरसेवक अपात्र
By Admin | Updated: September 11, 2014 23:05 IST2014-09-11T22:50:39+5:302014-09-11T23:05:23+5:30
नगरपरिषद बरखास्तीच्या उंबरठ्यावर

वेंगुर्लेतील राष्ट्रवादीचे १२ नगरसेवक अपात्र
सिंधुदुर्गनगरी : वेंगुर्ले नगरपरिषद नगराध्यक्ष निवडप्रक्रियेत गटनेत्यांनी काढलेला व्हीप धुडकावल्याप्रकरणी विद्यमान नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल यांच्यासह पाचजणांना, तर स्वेच्छेने पक्ष सोडल्याप्रकरणी वामन कांबळे यांच्यासह सातजणांना अशा एकूण राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील बाराही नगरसेवकांना जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी अपात्र ठरविले आहे. यामुळे वेंगुर्ले नगरपरिषद बरखास्तीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. वेंगुर्ले नगरपरिषदेमध्ये एकूण १७ नगरसेवक असून, यापैकी तब्बल १२ नगरसेवक अपात्र ठरल्याने ही नगरपरिषद अल्पमतात आली आहे. त्यामुळे नगरपरिषद बरखास्त करावी, या संदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठविला असल्याने नगरपरिषद आता बरखास्तीच्या उंबरठ्यावर आली आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांच्यासमोर सुनावणी होऊन त्यांनी हा निर्णय ९ सप्टेंबर रोजी दिला असून त्या दिवसापासूनच १२ ही नगरसेवक अपात्र झाले आहेत. नगरसेवकांना अपात्र केल्याचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात आला असून नगरपरिषद बरखास्तीसंदर्भातील निर्णय शासन घेणार आहे, तर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात हे सर्व बाराही नगरसेवक उच्च न्यायालयात अपील दाखल करू शकतात.वेंगुर्ले नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक ११ डिसेंबर २०११ रोजी झाली. यावेळी १७ नगरसेवकांपैकी १२ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘घड्याळ’ या अधिकृत निवडणूक चिन्हांवरून लढून विजयी झाले होते. त्यानंतर नम्रता कुबल व रमण वायंगणकर हे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदी विराजमान झाले. मात्र, त्यानंतर २५ जून २०१३ रोजी त्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले. यानंतर पुढील नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीवरून राष्ट्रवादीमध्ये दोन गट झाले. यातील एका गटाने गटनेते वामन कांबळे यांनी बजावलेला पक्षाचा व्हीप धुडकावला, तर राष्ट्रवादीचे सिंधुदुर्ग पक्षनिरीक्षक किरण पावसकर यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी बोलावलेल्या सभेस अनुपस्थित राहिल्याने पक्षविरोधी कारवाई केली असा ठपका ठेवत दोन्ही गटांतील बाराही नगरसेवकांना अपात्र करण्यात आले आहे.व्हीप धुडकावल्याने कारवाई
पक्षाने निश्चित केलेले गटनेते वामन कांबळे यांनी या निवडणुकीत पूजा कर्पे यांना मतदान करावे यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांना व्हीप बजावला होता. हा धुडकावल्याचे सिद्ध झाल्याने प्रसन्ना कुबल, चेतना केळुसकर, पद्मिनी सावंत, अन्नपूर्णा नार्वेकर, सुलोचना तांडेल या पाचही नगरसेवकांना अपात्र ठरविले आहे. (प्रतिनिधी)
यांच्यावरही कारवाई
पक्षनिरीक्षक किरण पावसकर यांनी राष्ट्रवादीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी बोलावलेल्या सभेकडे पाठ फिरविल्याने तसेच विरोधी पक्ष राष्ट्रीय काँग्रेस तसेच मनसे यांची मदत घेत नगराध्यक्ष म्हणून निवडून येणे आदी पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी गटनेते वामन कांबळे, पूजा कर्पे, नम्रता कुबल, अवधूत वेंगुर्लेकर, शैलेश गावडे, मनीष परब, फिलोमिना कार्डोस या सातजणांवरही जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्रतेची कारवाई केली आहे.