सिंधुदुर्ग जिल्ह्याला नवरात्रोत्सवाचे वेध - कणकवलीत तयारी
By Admin | Updated: September 23, 2014 23:53 IST2014-09-23T21:47:30+5:302014-09-23T23:53:05+5:30
जिल्ह्यात उद्यापासून ११३ ठिकाणी दुर्गामातेची स्थापना

सिंधुदुर्ग जिल्ह्याला नवरात्रोत्सवाचे वेध - कणकवलीत तयारी
सावंतवाडी : गणपती बाप्पाच्या निरोपानंतर वेध लागतात नवरात्रोत्सवाचे. आपल्या शक्तीने उन्मत्त होऊन देवादिकांनाही त्रास देणाऱ्या महिषासूर नामक दैत्याशी देवीने नऊ दिवस, नऊ रात्री युध्द करून त्याचा वध केला. म्हणून तिला ‘महिषासूरमर्दिनी’ म्हटले जाते. नवव्या दिवशी दैत्याचा वध झाल्यानंतर विजयोत्सवाचा दिवस म्हणजे दसरा. अशी नवरात्रोत्सवाची प्राचीन संकल्पना सांगितली जाते.
आदिमायेच्या उपासनेचा हा उत्सव संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या पध्दतीने साजरा केला जातो. महामाया, आदिशक्ती, महाकाली आणि महाशक्ती अशा विविध उपाधी असलेल्या देवीचा उत्सव मोठ्या मंगलमय वातावरणात साजरा होतो. गेल्या काही वर्षात शहरीभागापुरता मर्यादित असलेला नवरात्रोत्सव आता ग्रामीण भागातही पोहोचला आहे.
नवरात्रोत्सव म्हणजे गरबा आणि दांडिया नृत्य ओघाने आलेच. एरव्ही पाश्चिमात्य कर्णकर्कश संगीतावर ताल धरणारी तरुणाई नवरात्रीच्या काळात मात्र पारंपरिक वेशात थिरकते. नवरात्रोत्सवानिमित्त इतर विविध कार्यक्रमांबरोबरच दांडिया स्पर्धांचे आयोजन होत असल्यामुळे ग्रामीण भागातील कलाकारांनाही व्यासपीठ मिळू लागले आहे.
नवरात्रोत्सव मंडळांतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त नऊ दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये भजने, फुगड्या यासह दांडिया स्पर्धाही आयोजित केल्या जातात. तर दसऱ्या दिवशी देवीचे विधीवत पूजन करून मिरवणुकीसह विसर्जन केले जाते.
नवरात्रोत्सव म्हणजे केवळ गरबा, दांडिया हे तयार झालेले समीकरणही बदलणे आवश्यक आहे. आदिशक्तीच्या पूजनाबरोबरच समाजातील स्त्रीलाही सन्मानाची वागणूक देण्यासाठी समाजजागृती होणे अत्यावश्यक आहे. (वार्ताहर)
नवरात्रोत्सवाला अवघा एक दिवस उरला असताना या उत्सवाच्या निमित्ताने कणकवली शहराबरोबरच जिल्ह्यात ठिकठिकाणी जय्यत तयारी करण्यात येत आहे. श्री दुर्गादेवीच्या प्रतिष्ठापनेसाठी मंडप उभारण्याचे काम जोरदार सुरू आहे. तर दुर्गादेवीच्या मूर्तीची रंगरंगोटी सुरू असून मूर्तिकार या कामात दंग झाले आहेत.
घटस्थापनेने २५ सप्टेंबर रोजी नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. या उत्सवाच्या आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी तर काही ठिकाणी गुरूवारी श्री दुर्गादेवीची मूर्ती ढोलताशांच्या गजरात मिरवणुकीने आणण्यात येणार आहे. त्यादृष्टीने अनेक मंडळांकडून तयारी सुरू आहे. श्री दुर्गादेवीसाठी भव्य मंडप उभारण्यात येत आहे. या उत्सवात दांडियाबरोबरच गरब्याची धूम सर्वत्र पहायला मिळणार आहे.
कणकवली शहरात राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने येथील बसस्थानकासमोरील कार्यालयाजवळ, शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर, बसस्थानकासमोरील परिसरात गोंधळी बांधवांच्यावतीने तर बाजारपेठ मित्रमंडळाच्यावतीने कांबळीगल्ली येथे श्री दुर्गादेवीची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात येते. तर कलमठ येथे पोलीस स्थानकासमोर तसेच वृंदावन हॉलमध्ये गुजराती बांधवांच्यावतीनेही नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या ठिकाणी मंडप उभारण्याचे काम सुरू आहे. विद्युत रोषणाईही करण्यात आली असून त्यामुळे कणकवली शहराला एक प्रकारे उत्सवी स्वरूप प्राप्त झाले आहे.
नवरात्रोत्सवात प्रत्येक प्रभागाबरोबरच गल्लीगल्लीत रात्रीच्यावेळी गरबानृत्य रंगलेले पहायला मिळते. त्यादृष्टीने सध्या तयारी सुरु आहे. नवरात्रोत्सवातील नऊ दिवस विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
प्राचीन-ऐतिहासिक देवस्थानांची लगबग
सावंतवाडीतील माजगाव येथील श्री देवी सातेरी मंदिराच्या नवरात्रोत्सवाला सुमारे दोनशे वर्षांचा इतिहास आहे. गावातील तेरा वाड्यांमधील ग्रामस्थ उत्सवाच्या पूर्वतयारीत गुंतले आहेत. वेंगुर्ले येथील श्री देवी सातेरी मंदिरात नऊ दिवस नऊ रुपात देवीची पूजा बांधली जाते. तर कुडाळ येथील केळबाई नवरात्रोत्सव माहेरवाशिणींना जिव्हाळ्याचा ठरतो. यासह जिल्ह्यातील इतर ठिकाणीही नवरात्रोत्सव उत्साहात साजरा होतो.
शासकीय
यंत्रणांची सिद्घता
नवरात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे. शहरातील प्रत्येक महत्त्वाच्या उत्सवाच्या ठिकाणी दोन होमगार्ड आणि एक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आला आहे. त्यातच आगामी विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आल्याने शहरातील नाक्यानाक्यावर सजग पोलीस पहारा ठेवण्यात आला आहे.
सावंतवाडी शहरात प्रथमच बाजारपेठ मित्रमंडळातर्फे नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले. मंडळाचे हे २४ वे वर्ष असून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बाजारपेठ मित्रमंडळाचा नवरात्रोत्सव म्हणजे शहरवासीयांसाठी खास आकर्षण ठरतो. तसेच माठेवाडा मित्रमंडळ, आेंकार कला क्रीडा मंडळ, भटवाडी, जिमखाना मित्रमंडळ यांच्यावतीने दरवर्षी दुर्गापूजन करण्यात येते.
सावंतवाडी परिसरात भराडी दांडिया ग्रुप, कोनापाल, यंग स्टार दांडिया ग्रुप, तळवडे, जय भवानी ग्रुप, वेंगुर्ले, आेंकार कला क्रीडा मंडळ दांडिया ग्रुप, भटवाडी, नवदुर्गा दांडिया ग्रुप, सावंतवाडी, निरुखेवाडी दांडिया ग्रुप कोलगाव, होली फेथ दांडिया ग्रुप, निरवडे, जय गणेश दांडिया ग्रुप, मळगाव, दत्त प्रासादिक दांडिया ग्रुप, मळगाव, वडखोल दांडिया ग्रुप, वडखोल या महत्त्वाच्या दांडियाचा समावेश होतो.