राष्ट्रीय पेयजलच्या १७ योजना रखडल्या
By Admin | Updated: June 16, 2017 01:36 IST2017-06-16T01:36:11+5:302017-06-16T01:36:11+5:30
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गतच्या १७ योजनांचे काम पावसाळा सुरू होऊनही पुर्ण होऊ शकले नाही.

राष्ट्रीय पेयजलच्या १७ योजना रखडल्या
पावसाळा सुरू : काम संथगतीने, ग्रामस्थांना योजनेचे पाणी मिळणार पुढील उन्हाळ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमळ : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गतच्या १७ योजनांचे काम पावसाळा सुरू होऊनही पुर्ण होऊ शकले नाही. या गावांतील ग्रामस्थांना आता पुढील उन्हाळ्यातच पाणी मिळण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत ४६ गावांमध्ये पाणी पुरवठा योजनांचे काम सुरू करण्यात आले. या गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई असल्याने तेथे ही योजना राबविण्यात येत आहे. मात्र काम संथगतीने होत असल्याने या योजना रखडल्या आहेत. उन्हाळा संपतासंपता त्यापैकी २९ योजना कशातरी पूर्णत्वास गेल्या आहेत. तथापि अद्याप उर्वरित १७ गावांमध्ये काम सुरूच आहे. आता पावसाळा सुरू झाल्याने या योजना पूर्णत्वास जाण्याची शक्यता दुरावली आहे.
तीव्र पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे हाती घेण्यात आली. दिरंगाईमुळे या योजना अद्याप रखडल्या आहेत. आता पावसाळा सुरू झाल्याने काम करणे कठीण होणार आहे. परिणामी या १७ गावांमधील नागरिकांना आता पुढील वर्षीच्या उन्हाळ्यातच या योजनेचे पाणी मिळण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे ग्रामीण जनेतेत संताप व्यक्त होत आहे.