नाथ पै यांचे विचार प्रगतीकडे नेणार
By Admin | Updated: February 2, 2015 00:02 IST2015-02-01T23:08:18+5:302015-02-02T00:02:40+5:30
बाळासाहेब पाटणकर : जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरणे

नाथ पै यांचे विचार प्रगतीकडे नेणार
कुडाळ : बॅ. नाथ पै यांचे विचार प्रगतीच्या मार्गावर नेणारे आहेत. त्यामुळे नाथ पैंच्या विचारांचा माणूस निर्माण करूया, असे उद्गार बॅ. नाथ पै यांचे सहकारी ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते बाळासाहेब पाटणकर यांनी काढले.
येथील बॅ. नाथ पै विद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गांधी लोकसेवा संघाचे अध्यक्ष तसेच वर्ध्याच्या सेवाग्रामचे अध्यक्ष, जमनालाल बजाज पुरस्कारप्राप्त जयवंत मठकर होते.
यावेळी बाळासाहेब पाटणकर यांनी बॅ. नाथ पै यांचे कार्य तरुणांसमोर प्रतिपादन केले. वेतोरे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक प्रभाकर नाईक, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी विचार व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते कै. भाऊसाहेब धडाम स्मृतीप्रित्यर्थ जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेत्यांना गौरविले. या स्पर्धेत नववी ते बारावी गटात साईराज सुहास साळगावकर, शितल देवू बरागडे, अलिशा जॅकी फेराव यांनी प्रथम तीन, तर विनिता प्रशांत पांजरी हिने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. महाविद्यालयीन व खुल्या गटात कल्पना सच्चिदानंद ठुमरे, युक्ता प्रकाश नार्वेकर, भाग्यश्री दिलीप नर यांनी प्रथम तीन, तर रामचंद्र विठ्ठल राऊळ याने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. प्रसाद धडाम यांच्या सहकार्यातून या स्पर्धेचे आयोजन केले होते. तसेच माजी विद्यार्थी बाबी दळवी, शिक्षक पी. सी. राठोड यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
मुख्याध्यापक सुरेश येजरे यांनी आभार मानले. यावेळी उदय नाडकर्णी, बापू नेरूरकर, प्रभाकर वालावलकर, घनशाम वालावलकर, भाऊ पाटणकर, विठ्ठल पाटणकर, जयराम डिगसकर, सदानंद प्रभू, सुधीर पानवलकर आदी नाथ पै प्रेमी उपस्थित होते. (प्रतिनिधी)