नरेंद्र मोदींनी जनतेची फसवणूक केली
By Admin | Updated: October 13, 2014 23:06 IST2014-10-13T22:18:51+5:302014-10-13T23:06:46+5:30
भालचंद्र मुणगेकर : पाच महिन्यात पाच रूपयेही देशात आणले नाहीत

नरेंद्र मोदींनी जनतेची फसवणूक केली
कणकवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासह राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. काळे धन देशात आणणार असे त्यांनी म्हटले होते. मात्र, पाच महिन्यांच्या कालावधीत पाच रुपयेही देशात आणले नाहीत, अशी टीका राज्यसभेचे खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी कणकवलीत पत्रकार परिषदेत केली. यावेळी जिल्ह्याचे पक्षनिरीक्षक के. सुरेश, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, राष्ट्रीय काँग्रेस मागास सेलचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम, कणकवली तालुकाध्यक्ष प्रदीप सर्पे, सचिव अशोक कांबळी आदी उपस्थित होते.भालचंद्र मुणगेकर पुढे म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत देशातील जनतेला ‘अच्छे दिन आने वाले है’ असे सांगितले होते. ते अच्छे दिन आता कुठे आहेत? असा सवालही मुणगेकर यांनी केला. सत्तेत आल्यानंतर मोदींनी गरिबांच्या विरोधात निर्णय घेतले. महागाई कमी न करता महागाई वाढविली. काळे धन देशात आणू, असे सांगितले होते. मात्र, पाच महिन्यात पाच रुपयेही आणू शकले नाहीत. जीवनावश्यक औषधांच्या किमतीही भरमसाठ वाढविल्या आहेत. एकूणच देशात महागाई वाढवत नरेंद्र मोदींनी जनतेची दिशाभूल केल्याचे सांगत भालचंद्र मुणगेकर यांनी मोदींवर टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आमची १५ वर्षे आघाडी होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी घेतलेल्या जागावाटपाच्या अवाजवी भूमिकेमुळे आघाडी फिस्कटली. पहिल्यापासूनच राष्ट्रवादी पक्षाला आघाडी करायची नव्हती. त्यांनी स्वतंत्र लढण्याचे ठरविले होते, असेही भालचंद्र मुणगेकर यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, भाजप हा कागदावरचा पक्ष होता. सेनेची शिडी वापरुन भाजप मोठा झाला. गोपीनाथ मुंडे असते तर महाराष्ट्रात यावे लागले नसते, असे भाजपाचे नेते म्हणतात. याचा अर्थ मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपाकडे एकही नेता पात्रतेचा नाही, असे स्पष्ट होते. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी भाजपसारख्या पक्षाकडे कोणताच नेता नसल्याची टीका यावेळी त्यांनी केली.मराठी माणसाचा अजेंडा म्हणून शिवसेना पक्षाला मानले जाते. मात्र, मराठी माणसासाठी शिवसेनेने काय केले असा सवाल केला. शिवसेनेने १५ वर्षात मुंबईचा कोणता विकास केला? मुंबईतील प्रश्न अजूनही जैसे थेच आहेत. त्यामुळे मुंबईचा विकास करु न शकलेला शिवसेना पक्ष महाराष्ट्राचे काय भले करणार ? असा सवालही मुणगेकर यांनी यावेळी बोलताना केला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खुद्द देशाच्या पंतप्रधानांना यावे लागते. त्यामुळे भाजपाच्या उमेदवारांना आपल्या विजयाची खात्री नसल्याचे स्पष्ट होत आहे, असेही यावेळी भालचंद्र मुणगेकर यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील, अजित पवार यांच्यावरही मुणगेकर यांनी शाब्दीक हल्ला चढवला. ते म्हणाले, महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी असताना आबांनी केलेल्या लाजिरवाण्या वक्तव्याचा मी निषेध करतो. यावेळी अजित पवार यांनी केलेल्या बेताल वक्तव्यांचाही समाचार घेतला. जिल्ह्याचा विकास काँग्रेसमुळेच झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत कणकवली, मालवण आणि सावंतवाडी मतदारसंघातून काँग्रेसचे तिन्ही उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील, असा विश्वासही डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी यावेळी व्यक्त केला. (प्रतिनिधी)