नारायण राणेंची दहशतवादी प्रवृत्ती

By Admin | Updated: July 16, 2014 23:16 IST2014-07-16T23:14:42+5:302014-07-16T23:16:31+5:30

दीपक केसरकर यांचा आरोप : वैभववाडीत शिवसेनेकडून स्वागत

Narayan Rane's Terrorist Tendency | नारायण राणेंची दहशतवादी प्रवृत्ती

नारायण राणेंची दहशतवादी प्रवृत्ती

वैभववाडी : लोकशाही पद्धतीने विकासाची स्पर्धा जमत नसल्याने दहशतीच्या मार्गाने दुसऱ्याला संपविण्याची स्पर्धा नारायण राणे करीत आहेत. नारायण राणे ही प्रवृत्ती आहे. ती नष्ट करून जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करताना तिचा बिमोड केला जाईल, असे मत आमदार दीपक केसरकर यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेना प्रवेशाची घोषणा केल्यानंतर पहिल्या जिल्हा दौऱ्याची सुरूवात केसरकर यांनी वैभववाडीतून केली. येथील संभाजी चौकात आमदार केसरकर यांचे शिवसैनिकांनी जल्लोषी स्वागत केले. यावेळी जिल्हाप्रमुख वैभव नाईक, राजू शेटये, नगरसेवक सुशांत नाईक, भूषण परूळेकर, युवा सेनेचे हर्षद गावडे, तालुकाप्रमुख अशोक रावराणे, संघटक नंदू शिंदे, शंकर नारकर, जनार्दन विचारे, अमित लोखंडे, विलास साळसकर आदी उपस्थित होते.
दौऱ्याची सुरूवात करण्यापूर्वी आमदार केसरकर यांची विश्रामगृहावर पत्रकार परिषद झाली. ते म्हणाले, मी सत्तेच्या मागे धावणारा कार्यकर्ता नाही. त्यामुळे कोणत्याच पदाची अपेक्षा ठेवून आपण शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. तर राणे प्रवृत्ती मोडीत काढण्यासाठी शिवसेनेचे चांगले पाठबळ मिळत असल्याने मी सेनावासी होत आहे. त्यामुळे जनतेच्या प्रेमाची कदर ठेवून पक्षाची शिस्त पाळण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करणार आहोत, असे म्हणाले.
केसरकर म्हणाले, माझ्या प्रवेशामुळे शिवसेनेत नवा- जुना असा कोणताच वाद होणार नाही. तशी काळजी आपण आधीच घेतली आहे. शिवसेनेत माझे कोणीही समर्थक नसतील. जे असतील ते फक्त शिवसैनिकच असतील. शिवसेना आणि भाजपा ही तत्व आणि भावनेवर आधारलेली जुनी युती आहे. त्यामुळे माझ्या शिवसेना प्रवेशाने युतीत कटुता येणार नाही.
‘आपण करू तोच विकास’ हे लोकशाहीविरोधी राणेंचे धोरण जिल्ह्याच्या प्रगतीला मारक आहे. म्हणूनच जिल्ह्यात कोणीही उद्योजक गुंतवणूक करायला पुढे येत नाही. पुढील काळात हे चित्र पालटण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे,
असे दीपक केसरकर यांनी स्पष्ट
केले. (प्रतिनिधी)

सावंतवाडी मतदारसंघावर भाजपाने केलेल्या दाव्याबाबत विचारले असता केसरकर म्हणाले, जागा वाटपाचा निर्णय उद्धव ठाकरे आणि भाजपाचे वरिष्ठ नेते घेतील. युतीच्या नेत्यांनी सांगितले तर सावंतवाडीतून मी लढेन. नसेल तर युती देईल त्या उमेदवाराला निवडून आणेन. एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील तीनही आमदार युतीचेच असतील, असा विश्वास व्यक्त करीत सावंतवाडीबाबत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत आपली चर्चा झालेली असून तेच वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतील. मी त्यावर कोणतेही भाष्य करणार नाही.

Web Title: Narayan Rane's Terrorist Tendency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.