Gram Panchayat Election: राज्यात आघाडी मात्र सिंधुदुर्गात भाजप-शिंदे गटात बिघाडी; ग्रामपंचायत निवडणुकीत आमने सामने
By अनंत खं.जाधव | Updated: November 22, 2022 23:24 IST2022-11-22T23:23:54+5:302022-11-22T23:24:32+5:30
भाजपचा युती न करण्याचा विचार, महाराष्ट्रात पाच महिन्यापूर्वी भाजप व बाळासाहेबांची शिवसेना सत्तेवर आली असून महाराष्ट्रातील हा सत्तेचा फाॅम्युला संपूर्ण राज्यात लागू होणार असेच वाटत होते.

Gram Panchayat Election: राज्यात आघाडी मात्र सिंधुदुर्गात भाजप-शिंदे गटात बिघाडी; ग्रामपंचायत निवडणुकीत आमने सामने
सावंतवाडी : राज्यात जरी भाजप व बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात युती असली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत आघाडीत बिघाडी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी भाजप स्वबळाचा नारा देण्याच्या विचारात असल्याने भाजप शिंदे गट ग्रामपंचायत निवडणुकीत आमने सामने येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
याबाबतची अनौपचारिक बैठक दोन दिवसांपूर्वीच गोव्यात सिंधुदुर्ग चे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झाल्याचे बोलले जात असून त्याची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे.
महाराष्ट्रात पाच महिन्यापूर्वी भाजप व बाळासाहेबांची शिवसेना सत्तेवर आली असून महाराष्ट्रातील हा सत्तेचा फाॅम्युला संपूर्ण राज्यात लागू होणार असेच वाटत होते.तसे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी खरेदी विक्री संघात ही भाजप व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने युती करत हा फाॅम्युला कायम ठेवला व सत्ताही खेचून आणली मात्र त्यानंतर आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप ने सावध पवित्र घेण्याचे ठरवले आहे.आठवड्या पूर्वीच भाजप ची मळगाव येथे बैठक झाली.
त्या बैठकीत भाजपने ग्रामपंचायत निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला होता.मात्र युतीचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील असे सांगण्यात आले.तर दुसरीकडे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तर भाजप पुढे युतीचा प्रस्ताव ठेवत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मुंबई त चर्चा करण्यात येईल असे सांगितले होते.पण आता भाजप च्या वरिष्ठ नेत्यांनीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेने सोबत युतीचा प्रस्ताव नाकारण्याचा निर्णय घेतला आहे.याची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी भाजपच्या जिल्ह्यातील काहि नेत्यांसोबत वरिष्ठ नेत्यांनी चर्चा ही केल्याचा सांगण्यात येत आहे.
मागील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची कोणतीही ताकद नसताना सावंतवाडी मतदारसंघात 72 ग्रामपंचायत च्या जागा जिंकल्या होत्या मग आज भाजपची ताकद मोठ्याप्रमाणात वाढली आहे.त्याचा नक्कीच फायदा होणार आहे.त्यामुळेच युती केली तर गावपातळीवरील कार्यकर्त्याला ताकद कशी मिळणार तोच खरा पक्षाचा पाया असतो त्यामुळे कार्यकर्त्याला बळ द्याचे असेल तर युती नको असाच पवित्रा भाजपच्या नेत्यांनी घेतला आहे.
त्यामुळे सध्या तरी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप बाळासाहेबा च्या शिवसेनेशी युती करणार नसल्याचे निश्चित झाले असून याची अधिकृत घोषणा ही लवकरच होईल असे सांगण्यात येत आहे.
नेत्यांनी काय चर्चा केली माहित नाही
मी माझ्या घरगुती कार्यक्रमात व्यस्त असून नेत्यांनी काय चर्चा केली मला माहित नाही असे माजी आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सांगितले.