नारायण राणे यांनी राजकारणातून निवृत्त व्हावे

By Admin | Updated: August 7, 2014 00:29 IST2014-08-06T21:19:31+5:302014-08-07T00:29:12+5:30

प्रमोद जठार यांचा उपरोधिक सल्ला

Narayan Rane retired from politics | नारायण राणे यांनी राजकारणातून निवृत्त व्हावे

नारायण राणे यांनी राजकारणातून निवृत्त व्हावे

कणकवली : काँग्रेसने नारायण राणे यांची पूर्ण कोंडी केली आहे. आता ना काँगे्रसला त्यांचा उपयोग ना जनतेला. त्यामुळे इभ्रतीचे दशावतार आता पुरे झाले, असे सांगतानाच येथील विकासाची जबाबदारी आमच्यासारखी नवीन पिढी घ्यायला तयार असून राणे यांनी राजकारणातून सन्मानाने निवृत्त व्हावे, असा उपरोधिक सल्ला आमदार प्रमोद जठार यांनी नारायण राणे यांना दिला आहे.
येथील संपर्क कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हरेश पाटील, तालुकाध्यक्ष शिशिर परूळेकर आदी उपस्थित होते. आमदार जठार म्हणाले, नाराज असलेल्या नारायण राणेंना सोनिया गांधी अथवा राहूल गांधी भेटायला येणे अपेक्षित असताना कृपाशंकर सिंहांसारखी माणसे येतात, याला काय म्हणावे? त्यामुळे नारायण राणे यांनी आपली झाकली मूठ तशीच ठेवून आणखी इभ्रत घालवून घेऊ नये. जिथे फुले वेचली तिथे गोवऱ्या वेचू नका, अशी माझ्यासारख्या कोकणी माणसाची त्यांना कळकळीची विनंती आहे.
तरूण पिढीला आता त्यांनी राजकारणात संधी द्यावी. वेळ पडल्यास चिरंजीवांनाही त्यांनी राजकारणात आणल्यास त्यांच्यासमोर विरोधी पक्ष म्हणून काम करण्यास आम्ही सक्षम आहोत. राणे यांच्यासारख्या नेत्यांनी सिंधुदुर्गच्या विकासासाठी केंद्रशासनाचा कधीही उपयोग करून घेतला नाही. मात्र विकासाच्या एका नव्या टप्प्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्याला नेऊन ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे.
यासाठी केंद्रीय रस्ते, बांधकाम विकास मंत्री नितीन गडकरी तसेच पर्यटन व सांस्कृतिक मंत्री श्रीपाद नाईक यांची दिल्ली येथे नुकतीच आपण भेट घेतली. सिंधुदुर्गातून जाणाऱ्या सागरी महामार्गाप्रमाणेच सुमारे दीडशे किलोमीटर लांबीचा आंबेरी ते सातार्डा पर्यटन महामार्ग उभारण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
जानवली गणपती साना येथे पूल बांधण्यात यावा, यासाठी केंद्रीय रस्ते विकास महामंडळाकडे अडीच कोटींचा प्रस्ताव देण्याबरोबरच देवगड व कणकवली तालुक्यात विविध ठिकाणी दहा पूल उभारण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण बीओटी तत्वावर न करता शासकीय निधीतून करण्यात यावा, या मागणीलाही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
तळेरे बाजारपेठेबाबत ७ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजता ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांबरोबर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सन २०१७ पर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश मंत्री गडकरी यांनी दिले आहे. तर मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे विजयदुर्ग किल्ल्याजवळील आंग्रिया बेटाचा विकास करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या ठिकाणी स्कुबा डायव्हिंगसारखी सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच समुद्र विश्वाचे दर्शन पर्यटकांना घडावे, असा प्रकल्प तयार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मुंबई-गोवा जलवाहतूक सुरू करण्यासाठी केंद्रीय स्तरावरून प्रयत्न करण्यात येत असल्याचेही आमदार जठार यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Narayan Rane retired from politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.