नमो गुरूजींच्या तासांमुळे शिक्षकांची होणार धावपळ
By Admin | Updated: September 4, 2014 23:20 IST2014-09-04T23:00:18+5:302014-09-04T23:20:45+5:30
अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी विविध माध्यमाव्दारे थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

नमो गुरूजींच्या तासांमुळे शिक्षकांची होणार धावपळ
अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी विविध माध्यमाव्दारे थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पत्र पाठवून ३ हजार ६६० शाळेतील शिक्षकांना दुपारी ३ ते ३.४५ या वेळेत शाळेत हजर राहत रेडिओ, टीव्हीच्या माध्यमातून मोदी यांचे भाषण ऐकविण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकांची चांगलीच धावपळ होणार आहे.
दरवर्षी पाच सप्टेंबरला जिल्हा परिषदेचा शिक्षक दिनाचा भव्य कार्यक्रम होत असतो. याच दिवशी गावागावात शिक्षकांचा सत्कार समारंभ पार पडत असतो. या दिवशी शाळेला सुट्टी असल्याने शिक्षकांना शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता येत असते. मात्र, यंदा दुपारच्या सत्रात पंतप्रधान मोदी एकाच वेळी विविध माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असल्याने शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याची सक्ती करण्यात आलेली आहे.
जिल्हा परिषदेचा जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा सकाळी नगरजवळ होणार आहे. हा कार्यक्रम संपल्यानंतर शिक्षकांना थेट नेमणुकीची शाळा गाठावी लागणार आहे. त्या ठिकाणी त्यांना मोदी यांचे भाषण विद्यार्थ्यांना ऐकवावे लागणार आहे. हा कार्यक्रम सक्तीचा नसला तरी त्याचा अहवाल शिक्षण विभाग जमा करणार आहे. यामुळे शिक्षकांना शाळेत उपस्थित रहावेच लागणार आहे.जिल्ह्यात ३ हजार ६६० शाळा आहेत. या पैकी बहुतांशी काळात टिव्ही अथवा संगणक सुविधा उपलब्ध आहेत. ज्या ठिकाणी ही सुविधा नाही, त्या ठिकाणी रेडिओची सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)