मालवण नगराध्यक्षांचे नाव पत्रिकेतून डावलले
By Admin | Updated: January 29, 2015 00:10 IST2015-01-28T22:18:19+5:302015-01-29T00:10:45+5:30
आचरेकर, तोडणकरांची नाराजी

मालवण नगराध्यक्षांचे नाव पत्रिकेतून डावलले
मालवण : गेल्या २५ वर्षात नारायण राणे यांच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेकवेळा सिंधु महोत्सव आयोजित करण्यात आले. हे महोत्सव यशस्वीही झाले. या प्रत्येक महोत्सवाच्यावेळी सर्वपक्षीयांना सामावून घेण्यात आले होते. मात्र, यावेळच्या मालवणात होणाऱ्या सिंधुमहोत्सवात सर्वपक्षीयांना सामावून घेण्यात आले नाही. एवढेच काय तर मालवणचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांचे निमंत्रण पत्रिकेवर नावही प्रसिद्ध करण्यात आले नाही. यात जिल्हा प्रशासनाचा दोष नसून यात काही राजकीय मंडळींचा कुटील डाव असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर आणि मालवणचे नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांनी करून सिंधुमहोत्सवाच्या नियोजनाविषयी नाराजी व्यक्त केली.मालवण येथे शासनाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सिंधुमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणचे नगराध्यक्ष अशोक तोडणकर आणि माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी नगराध्यक्षांच्या दालनात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत नगरसेवक दीपक पाटकर, मंदार केणी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर म्हणाले, मालवणात शासनाच्यावतीने सिंधुमहोत्सव होत आहे. ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. या सिंधुमहोत्सवामुळे मालवणच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. मात्र, मालवणात सिंधुमहोत्सव होत असताना या महोत्सवाच्या कार्यक्रम पत्रिकेवर प्रोटोकॉलनुसार नगराध्यक्षांचे नाव असणे गरजेचे होते. मात्र नगराध्यक्षांचे नाव वगळण्यात आले. यात जिल्हाधिकाऱ्यांचा कोणताही दोष नाही. मात्र नगराध्यक्षांचे नाव डावलण्यात काही राजकीय मंडळींचे कुटील कारस्थान कारणीभूत आहे. मालवणचे नगराध्यक्ष अशोक तोडणकर म्हणाले, सिंधु महोत्सवाच्या कार्यक्रम पत्रिकेवर मालवणचा प्रथम नागरिक म्हणून नगराध्यक्षांचे नाव असणे गरजेचे होते. आपला शासनावर रोष नाही. मात्र काही राजकीय व्यक्तींकडून नाव डावलले गेले, याची खंत आहे. फेबु्रवारी महिन्यात मालवणात पालिकेच्यावतीने महोत्सव होण्यासाठी नियोजन केली असल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)