नाईक यांनी जनतेची दिशाभूल करणारी वक्तव्ये करू नयेत

By Admin | Updated: November 27, 2014 00:26 IST2014-11-26T22:13:42+5:302014-11-27T00:26:41+5:30

सी वर्ल्ड प्रकल्पावरून नीतेश राणे यांचा टोला

Naik should not make misleading statements of the people | नाईक यांनी जनतेची दिशाभूल करणारी वक्तव्ये करू नयेत

नाईक यांनी जनतेची दिशाभूल करणारी वक्तव्ये करू नयेत

कणकवली : सी वर्ल्ड प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट होणार आहे. मात्र, मालवण येथील जनतेचा विरोध लक्षात घेऊन राज्य शासनाने हा प्रकल्प जिल्ह्याबाहेर हलविण्याचा निर्णय घेतला तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचेच फार मोठे नुकसान होणार आहे. यासाठीच मालवणच्या जनतेला हा प्रकल्प नको असेल तर देवगड तालुक्यातील जनतेला विश्वासात घेऊन हा प्रकल्प तेथे नेण्याचा प्रयत्न करण्यात येईल अशी भूमिका मी मांडली आहे. त्यामुळे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी पूर्ण माहिती न घेता जनतेची दिशाभूल करणारी वक्तव्ये करू नयेत, असा टोला काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यानी लगावला आहे.
सी वर्ल्ड प्रकल्पाबाबतच्या आमदार नीतेश राणे यांच्या वक्तव्यावरून आमदार वैभव नाईक यांनी टीका केली होती. याला प्रसिद्धीपत्रकाद्वारे आमदार राणे यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, विरोधी पक्षाचा आमदार म्हणून नीतेश राणे सी वर्ल्ड प्रकल्पाबाबत काहीही करु शकणार नाहीत. त्यांची दखल घेण्याची गरज नाही अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. मात्र महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता हा शिवसेनेचा आहे. त्यामुळे वैभव नाईक हेही विरोधी पक्षाचेच आमदार आहेत. त्याची त्यांनी प्रथम जाणीव ठेवावी. कोणाच्याही ‘अरे’ ला मी ‘का रे’ करू इच्छित नाही.
सी वर्ल्ड प्रकल्पाबाबत राजकारणही करण्याची माझी इच्छा नाही. मात्र, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सी वर्ल्ड प्रकल्प मालवणमध्ये होणार असे जाहीर केले तेव्हापासून वायंगणी आणि तोंडवळी गावच्या ग्रामस्थांबरोबर शिवसेनेचे कार्यकर्ते व नेते प्रकल्पाला विरोध आहे असेच मानत आलेले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही शिवसेनेच्या नेत्यांनी केलेली वक्तव्येही सी वर्ल्ड प्रकल्पाला विरोधच करणारी आहेत. त्यामुळे मालवणच्या जनतेला सी वर्ल्ड प्रकल्प नको असेल किंवा ग्रामपंचायतीच्या ठरावातून या प्रकल्पाला विरोध होत असेल तर हा प्रकल्प देवगड येथे नेण्याचा आपला प्रयत्न राहील, असे आपण सांगितले आहे. जनतेचा विरोध लक्षात घेऊन शासनाने हा प्रकल्प जिल्ह्याबाहेर नेल्यास जिल्ह्याचेच नुकसान होणार आहे. प्रकल्प जिल्ह्यात रहावा यासाठी देवगडच्या जनतेला विश्वासात घेऊन तेथे प्रकल्प नेण्याचा प्रयत्न स्वत: करेन अशी भूमिका मांडली आहे. वायंगणी, तोंडवळी ग्रामस्थांचा १२०० एकर जमीन प्रकल्पासाठी देण्याला विरोध आहे. पर्यटन मंत्रालय किंवा एमटीडीसीने आवश्यक तेवढीच जमीन घ्यावी, अशी त्यांची मागणी आहे. पण देवगड तालुक्यातील काही ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी या प्रकल्पासाठी सकारात्मकता दर्शविली आहे. (वार्ताहर)


शिवसेनेकडून मतांसाठी जनतेला खोटी आश्वासने
देवगड तालुक्यातील किनारपट्टीच्या भागात एक टक्काही मासेमारी होत नाही अशी अनेक ठिकाणे आहेत. तसेच १२०० एकर जमीन देण्याचीही अनेक लोकांची तयारी आहे. या सगळ्या गोष्टींची माहिती घेतल्यानंतरच सी वर्ल्डबाबत मी वक्तव्य केले आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांनी निव्वळ मतांसाठी खोटी आश्वासने देऊन निवडणूक जिंकण्याचा स्टंट करू नये. जैतापूर प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका आता बदलत चालली असून त्यांनी जनतेची दिशाभूल थांबवून आपली नेमकी भूमिका स्पष्ट करावी, असेही या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Web Title: Naik should not make misleading statements of the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.