अनैतिक संबंधातून पतीचा खून- सांगाड्याचे रहस्य उलघडले
By Admin | Updated: July 29, 2014 23:03 IST2014-07-29T22:07:47+5:302014-07-29T23:03:57+5:30
प्रियकराची घेतली साथ, खुनाला वाचा फुटली

अनैतिक संबंधातून पतीचा खून- सांगाड्याचे रहस्य उलघडले
देवगड : अनैतिक संबंधांना अडथळा होत असल्याच्या कारणावरून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीच्या डोक्यात दगडी पाटा घालून खून केला. त्यानंतर दोघांनी संगनमताने पतीचा मृतदेह शौचालयाच्या टाकीत टाकून दिला. इतरांना संशय येऊ नये म्हणून पती बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्थानकात दिली. परंतु शेवटी खुनाला वाचा फुटली. घटनेनंतर तीन वर्षांनी पोलीस तपासात मुरूगेश कृष्णन गवंडर याचा सांगाडा शिरगांव परिसरातील बंगल्याच्या शौचालयाच्या टाकीमध्ये पोलिसांना आढळला. ही सर्व बाब उघड झाली.
या घटनेतील पत्नी भारती मुरूगेश गवंडर ही काही वर्षापूर्वीच मृत झाली आहे. मात्र पोलीस आता प्रियकर व आरोपी नं. २ दत्ताराम पंधारे याचा शोध घेत आहेत.कर्नाटक येथील रंगनेल्ली गावातील इंद्रानगर तरीकेरे या चिकमंगळूर जिल्ह्यातील मुरूगेश गवंडर हा हरहुन्नरी कामगार होता. तो खलाशी म्हणूनच देवगड बंदरात काम करीत असे व शिरगांव परिसरात घर करून राहत होता. त्याची पत्नी भारती गवंडर ही सुद्धा त्याच्यासोबत राहत होती. दरम्यान, कुडाळ तालुक्यातील आंगिवडे पंधारेवाडी येथील दत्ताराम पंधारे याच्याबरोबर भारती हिचे अनैतिक संबंध होते. परंतु त्यांना मुरूगेशचा अडथळा वाटू लागला. त्यामुळे अखेर दोघांनी ३ जानेवारी २०१० चे पूर्वी एका दिवशी मुरूगेश याला एकटे गाठून त्याच्या डोक्यात दगडी पाटा घालून त्याला ठार मारले. परंतु त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी राहत असलेल्या घराजवळच एका शौचालयाच्या टाकीत मृतदेह टाकले. तसेच इतर लोकांना व नातेवाईकांना संशय येऊ नये म्हणून मुरूगेश खलाशी कामावर असताना बेपत्ता झाल्याची तक्रारही पोलीस स्थानकात दिली.मात्र याबाबत पोलिसांना वेगळाच संशय येत होता. त्यामुळे त्याच्यावर पाळत ठेऊन याबाबतची बातमी मिळविण्यात पोलीस यशस्वी झाले. संशयावरून याच शौचालयाच्या टाकीजवळ खोदकाम केल्यावर एक मानवी सांगाडा त्याना आढळला. सखोल चौकशी सुरू झाल्यानंतर पोलिसांनी मुरूगेशच्या जवळच्या नातेवाईकांचीही मदत घेतली. त्यावेळी त्याची पत्नी भारती ही अगोदरच मृत झाली असल्याचे स्पष्ट झाले. चौकशी दरम्यान पुतण्या शणमुगम कृष्णन आदी द्रवीड गवंडर यानेही सहकार्य केले व तक्रार दिली. चौकशी सुरू झाल्यानंतर दत्ताराम पंधारे याचा शोध सुरू करण्यात आला. परंतु तो त्याच्या राहत्या ठिकाणी आढळून आला नाही. मात्र पोलिसांनी मुरूगेशची पत्नी भारती गवंडर व दत्ताराम पंधारे यांच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी देवगड पोलीस निरीक्षक अरविंद बोडके तपास करीत आहेत. पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जायपत्रे, आर. बी. पाटील, सुरेश पाटील, पी. आर. सावंत, अनंत भांड्ये हे पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)