आचरेकर मृत्यूबाबत गूढ
By Admin | Updated: November 11, 2014 23:22 IST2014-11-11T22:15:27+5:302014-11-11T23:22:38+5:30
खैदा येथील घटना : मृतदेहाकडे सापडलेल्या चिठ्ठ्यांद्वारे तपास सुरू

आचरेकर मृत्यूबाबत गूढ
मालवण : खैदा न्हिवेवाडी येथील महादेव देऊ आचरेकर (वय ४७) यांनी सोमवारी दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघड झाल्यानंतर त्यांच्याजवळ सापडलेल्या चिठ्ठ्यांवरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. वैद्यकीय शवविच्छेदन अहवालात आचरेकर यांचा मृत्यू गळफासामुळेच झाला असला तरीही शरीरात अल्कोहोल आढळून आल्याने अधिक तपासासाठी त्यांचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित बुलबुले यांनी सांगितले.महादेव आचरेकर हे सोमवारी सकाळी १०.३० वाजता घराबाहेर पडले होते. त्यांच्या भावाने पोलिसांत तशी तक्रार दिली आहे. तत्पूर्वी १० वाजता ते खैदा येथील आपल्या नेहमीच्या दुकानात मित्रांसमवेत दिसून आले होते. त्यानंतर सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला.पाचच दिवसांपूर्वी गावात सुंदर तुकाराम वस्त (वय ४०, रा. साळकुंभा) यांचा मृतदेह आढळून आला होता. ही घटना ४ नोव्हेंबर रोजी घडली होती. वस्त यांचा मृतदेह कातवड प्राथमिक शाळेनजीक रस्त्यालगत आढळून आला होता. वस्त यांच्या आकस्मिक मृत्यूप्रकरणी आचरेकर यांनी पंच म्हणून काम पाहिले होते. या संदर्भात पोलीस निरीक्षक विश्वजीत बुलबुले यांना विचारले असता ते म्हणाले, वस्त यांच्या मृत्यूप्रकरणी अजूनपर्यंत संशयास्पद काहीही आढळून आलेले नाही. त्यांना अनेक महिन्यांपासून फिट यायची सवय होती. वस्त यांच्या शवविच्छेदन अहवालातही संशयास्पद काहीही आढळून आले नाही. मात्र वस्त यांचा व्हिसेरा अधिक तपासासाठी पुणे व मिरज येथे पाठविण्यात आला आहे. वस्त यांच्या मृत्यूप्रकरणी आचरेकर हे पंच असल्याने त्यांना पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले होते असे बुलबुले म्हणाले. दरम्यान, आचरेकर हे कोणत्यातरी दडपणाखाली होते. यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी अशी चर्चा गावात सुरु झाली आहे. यामुळे आचरेकरांना नेमके कशाचे दडपण होते याचा तपास लावणे पोलिसांना आव्हान आहे.
त्या चिठ्ठ्यांचा अर्थ काय?
पोलीस तपासात आचरेकर यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. यानंतर आणखी काही चिठ्ठ्या पोलिसांना सापडून आल्या आहेत. या चिठ्ठ्यांमध्ये आचरेकर यांनी काही मोबाईल नंबर त्यांच्याशी झालेली चर्चा लिहून ठेवली आहे. फोनवर झालेली चर्चा त्यांनी आपल्या मित्रालाही सांगितल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे. वस्त यांच्या मृत्यूप्रकरणी पंच राहिल्याबाबतही त्यांच्याशी काहीजणांनी भेटून व फोन करून चर्चा केल्याचे त्यांनी एका चिठ्ठीत लिहिले आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याला २० हजार रुपये दिले होते. ते आपल्याला प्रामाणिकपणे परत कर असेही एका चिठ्ठीत लिहून ठेवण्यात आले आहे.
सापडून आलेल्या चिठ्ठ्या या आचरेकर यांच्याच आहेत अथवा नाहीत हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, सापडलेल्या चिठ्ठ्यांबाबत पोलिसांना विचारले असता चिठ्ठ्या मिळाल्याचे सांगण्यात आले मात्र त्यातील मजकुराचा अर्थबोध होत नसल्याचे बुलबुले यांनी स्पष्ट केले. आचरेकर यांच्या आत्महत्येच्या तपासामधील सर्व शक्यता पडताळून पहात असल्याचेही त्यांनी
सांगितले. (प्रतिनिधी)
वस्त यांचा खूनच : नातेवाईकांचा आरोप
४ नोव्हेंबर रोजी कातवड येथे मृत स्थितीत आढळून आलेल्या सुंदर वस्त यांचा खून करण्यात आला आहे. त्यांच्या शरीरावर जखमा तसेच अन्य घाव होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुंदर वस्त यांच्या नातेवाईकांनी पोलिसांजवळ केल्याचे पुढे आले आहे. आचरेकर व वस्त यांच्या मृत्यूमागे काही समान धागेदोरे आहेत का या दृष्टीनेही तपास व्हावा अशी भूमिका वस्त यांच्या नातेवाईकांनी घेतली आहे. वस्त यांच्या शरीरावर जखमा व मारहाण झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यांचा चेहराही काळा ठिक्कर पडला होता. याप्रकरणात आम्हाला आचरेकर यांनी सहकार्य केले. आता त्यांचाही संशयास्पद मृत्यू झाला. त्यामुळे सुंदर वस्त यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी, अशी आग्रही मागणी त्यांच्या नातेवाईकांनी मालवण पोलिसांजवळ केली आहे. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी विजय खरात यांनी मालवण पोलीस ठाण्याला भेट देऊन याबाबत माहिती घेतली.