दिवा पडून लागलेल्या आगीत मायलेकीचा मृत्यू
By Admin | Updated: April 3, 2016 23:50 IST2016-04-03T23:08:44+5:302016-04-03T23:50:50+5:30
एक गंभीर : तुळस सिद्धार्थनगर येथील घटना

दिवा पडून लागलेल्या आगीत मायलेकीचा मृत्यू
वेंगुर्ले : तुळस - सिद्धार्थनगर येथे शनिवारी मध्यरात्री दिवा पडून गणेश तुळसकर यांच्या घरात लागलेल्या आगीत त्यांची पत्नी आणि मुलीचा मृत्यू झाला, तर गणेश तुळसकर यांची प्रकृती चिंताजनक आहे.
सविस्तर वृत्त असे, शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास गणेश तुळसकर यांच्या घरात अंथरुणास आग लागली. यावेळी झोपी गेलेली गणेश तुळसकर यांची पत्नी द्रौपदी व मुलगी भाग्यश्री या दोघी गंभीररीत्या भाजून जखमी झाल्या. त्यामुळे त्यांना ओरोस व गोवा-बांबुळी येथे उपचारांसाठी हलविण्यात आले होते. दरम्यान, ओरोस येथील रुग्णालयात भाग्यश्री हिचा, तर गोवा - बांबुळी येथील रुग्णालयात द्र्रौपदी यांचा मृत्यू रविवारी झाला. गणेश तुळसकर यांची
प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर गोवा-बांबुळी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अंथरुणातील तिघेजण आगीत होरपळले. ग्रामस्थांनी वाचवेपर्यंत ते तिघेही ७० ते ८० टक्के भाजले होते. त्यांना नजीकच्या तुळस प्राथमिक केंद्र्रातून ओरोस व गोवा - बांबुळी येथे पहाटे साडेचार वाजता हलविण्यात आले होते. ओरोस येथे भाग्यश्रीचा सकाळी सात वाजता, तर गोवा-बांबुळी येथे द्रौपदी यांचा सकाळी ११ वाजता मृत्यू झाला.
गणेश तुळसकर यांची सात वर्षांची जैतीर विद्यालय तुळस येथे दुसरीमध्ये शिक्षण घेणारी मुलगी यशश्री ही आपल्या काकांसमवेत तुळस-मळी येथे सुरू असलेल्या कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी गेल्याने बचावली. घटनास्थळीचा आक्रोश, आई-वडिलांचे विव्हळणे, त्यांना गाडीतून उपचारासाठी नेण्याच्या प्रकारामुळे ती बिथरली आहे. तिचे आईचे छत्र हरपले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रतनसिंग रजपूत, उपनिरीक्षक शहाजी शिरोळे, पोलिस हेडकॉन्स्टेबल खोबरेकर, वेंगुर्ले तहसीलदार सुरेश नाईक, सर्कल बी. एम. तुळसकर, तलाठी वजराठकर, जी. डी. सावंत, शहर तलाठी व्ही. एन. सरवदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. (प्रतिनिधी)