बँक खात्यातील पैशांची परस्पर लूट
By Admin | Updated: September 11, 2014 00:01 IST2014-09-10T22:28:55+5:302014-09-11T00:01:31+5:30
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

बँक खात्यातील पैशांची परस्पर लूट
सावंतवाडी : अज्ञात व्यक्तीने आपल्या बँक अकाऊंटमधील तब्बल ४० हजार रुपये परस्पर काढल्याची तक्रार इन्सुली येथील रघुनाथ मधू कोपकर यांनी सावंतवाडी पोलिसात दिली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रघुनाथ मधू कोपकर हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. ते मुंबई येथे वास्तव्यास असतात. नवी मुंबई येथे त्यांचे युनियन बँकेत खाते आहे. सध्या ते गणेशोत्सवाकरिता गावी आले होते. २८ आॅगस्ट रोजी कोपकर यांनी सावंतवाडी येथे सकाळी १०.३० वाजता एटीएममधून दहा हजार रुपये काढले होते. दरम्यान, रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर १० हजार रुपये काढल्याचा एसएमएस आला. त्यानंतर पाच मिनिटांच्या फरकाने तब्बल चार वेळा मिळून चाळीस हजार रुपये काढले गेले. तसे एसएमएस त्यांच्या मोबाईलमध्ये आहेत. दरम्यान, त्यांनी याबाबत नातवाईकांकडे चौकशी केली. मात्र, त्याच्या जवळच्या व्यक्तीने हा प्रकार केला नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (वार्ताहर)