सावंतवाडी: गेले अनेक दिवस मोती तलावाच्या काठावर असलेला संगीत कारंजा अखेर पाण्यात उतरविण्यात आला असून त्याचे पहिले प्रात्यक्षिक बुधवारी झाले. या संगीत कारंजामुळे सावंतवाडी शहरातील पर्यटनाला झळाळी मिळणार आहे. कारंजे आणि लेझर शोचे मोठे स्ट्रक्चर तलावात उतरविण्याचे काम पूर्ण झाले आहे. सावंतवाडी शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी तब्बल साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी लागणारे सर्व साहित्य शहरात दाखल झाले होते. त्यानंतर रंगीत कारंजे आणि लेझर शोचे भव्य स्ट्रक्चर तलावाच्या काठावर तयार करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी हे आकर्षक स्ट्रक्चर आता सुरक्षितपणे मोती तलावात उतरविण्यात आले आहे.या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध असल्याने हे काम वेळेत पूर्ण होण्याची शक्यता आहे. रंगीत कारंजे आणि लेझर शोच्या नयनरम्य दृश्य बघायला मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होतील, ज्यामुळे निश्चितच शहराच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी निधी 'सिंधुरत्न' योजनेंतर्गत मंजूर करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकी पूर्वी या कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न होता. परंतु काही अपरिहार्य कारणांमुळे ते शक्य झाले नाही. आता मात्र या कामाला लवकरच प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.
सावंतवाडीच्या पर्यटनाला नवी झळाळी; मोती तलावात संगीत कारंजा, लेझर शो पाहायला मिळणार
By अनंत खं.जाधव | Updated: May 8, 2025 17:33 IST