संगीत तानसेनने केली घोर निराशा
By Admin | Updated: January 23, 2015 23:34 IST2015-01-23T21:57:34+5:302015-01-23T23:34:53+5:30
स्पर्धेतले नाटक : संगीत, प्रकाशयोजना, नेपथ्य आघाड्यांवर कमी

संगीत तानसेनने केली घोर निराशा
५४व्या महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत ‘संगीत धन्य ते गायनी कळा’ हे सादर झालेले सहावे नाटक. हे नाटक मन्वंतर कला मंडळ, वसई या संस्थेने सादर केले.नाटकाची सुरुवात ‘सरस्वती माते वंदन तुजला’ या नांदीने झाली. नांदीपासूनच नाटक खाली घसरु लागले.दशरथ राऊत (तानसेन) हे तानसेनाच्या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकले नाहीत. ‘सं. धन्य ते गायनी कळा’ हे नाटक म्हणजे संगीत सम्राट तानसेनाच्या जीवनावर आधारलेली कथा.दशरथ राऊत (तानसेन) हे त्यांच्या वयाचा विचार करता ज्येष्ठ नागरिक असावेत, असे वाटले. त्यामुळे त्यांच्या सादरीकरणात तानसेनाचा रुबाब दिसला नाही. तानसेन रचित ज्या चीजा नाटकात होत्या, त्या वेगवेगळ्या तालात बांधलेल्या होत्या. ते ताल सांभाळताना, दशरथ राऊत (तानसेन) बऱ्याचदा रागविस्तारात अडकत होते. तालावर प्रभूत्व दिसले नाही. बऱ्याचशा चीजा, आड लयीत, वेगवेगळ्या मात्रात उठणाऱ्या होत्या. पण ताल सांभाळताना त्यांची चूक होत होती.पल्लवी नेरकर (पूर्णा) यासुद्धा अभिनयात कमी पडल्या. चीजा गाण्याचा प्रयत्न चांगला होता. पण गळ्यातून तान चांगली जात नव्हती.मंजिरी म्हसकर (रुपवती) यांनी आपली भूमिका सुंदर साकार केली. इतर कलाकारांनी आपल्या परीने भूमिका वठविण्याचा प्रयत्न केला. पण, तो फारसा यशस्वी झाला नाही.‘धन्य ते गायनी कळा’ हे नाटकाचे नाव. परंतु एकाचेही गाणे धन्य करणारे नव्हते. नेपथ्य सुंदर होते. प्रकाश योजनेत गोंधळ होत होता. वेशभूषा, रंगभूषा आकर्षक वाटले. कॉलर माईक कुठे लावावे याचे भान ठेवले नाही.प्रमुख भूमिका पडल्यामुळे बाकीची पात्रही आपला प्रभाव पाडू शकली नाहीत. दशरथ राऊत (तानसेन) दुसऱ्या अंकाच्या शेवटी मुलतानी रागाच्या तराण्याने शब्द विसरल्यामुळे तो तराणा आॅर्गनवर वाजवून दाखवण्यात आला व नंतर त्यांनी तो गायला. ही गोष्ट खूपच दुर्दैवी होती. संगीत साथ ठीक होते. पार्श्वसंगीत मात्र फारसे आकर्षक वाटले नाही.या नाटकाने रसिकांची घोर निराशा झाली. याचे कारण म्हणजे दिग्दर्शनसुद्धा कमी पडले. हृदयनाथ कडू (दिग्दर्शक) यांनी नाटक उभारण्याकडे फारसे लक्ष दिलेले नसल्याचे जाणवले.आपण स्पर्धेत उतरत आहोत, याचा विचार कोणीच केलेला नसावा, असे वाटले. वसई (मुंंबई) कडील भागातून असे नाटक सादर होईल, असे वाटले नव्हते. सर्वच आघाड्यांवर नाटक बीनसल्यामुळे रसिकांना हे नाटक म्हणजे एक तालीम वाटली. या सर्व कलाकारांनी आपण संगीत नाटकात भूमिका करतो आहोत याचे भान ठेवले पाहिजे. हे भान मात्र या नाटकामध्ये कोठेही पाहायला मिळाले नाही.
राज्य नाट्य
स्पर्धा
संध्या सुर्वे