कणकवलीत शनिवारी संगीत महोत्सव
By Admin | Updated: February 26, 2015 00:20 IST2015-02-25T21:15:26+5:302015-02-26T00:20:22+5:30
नामवंतांची उपस्थिती : आचरेकर प्रतिष्ठानच्यावतीने आयोजन

कणकवलीत शनिवारी संगीत महोत्सव
कणकवली : येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने शनिवारी (दि.२८) व रविवारी (दि. १ मार्च) १७ वा संगीत महोत्सव प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात सुप्रसिद्ध गायिका देवकी पंडित, पं. मोहन दरेकर, पं. शैलेश भागवत, पं. राजा काळे उपस्थित राहून आपली कला सादर करणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहकार्याने संगीत महोत्सवांतर्गत शास्त्रीय संगीत रसग्रहण कार्यशाळा व पं. जितेंद्र अभिषेकी स्मृती संगीत संमेलन आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी १० वाजता कणकवलीच्या नगराध्यक्षा अॅड. प्रज्ञा खोत यांच्या हस्ते या संगीत महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी सुप्रसिद्ध गायिका देवकी पंडित, सनई वादक पं. शैलेश भागवत, पं. जितेंद्र अभिषेकी, सघनगान शिक्षण केंद्राचे गुरू पं. समीर दुबळे उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन समारंभानंतर संगीत महोत्सवाचे पहिले सत्र सकाळी १०.३० वाजता सुरू होईल, तर दुसरे सत्र दुपारी ३ वाजता होईल. रविवारी सकाळी १० वाजता तिसरे सत्र होणार आहे. या तीन सत्रांमध्ये देवकी पंडित यांची गायन कार्यशाळा, तसेच पं. शैलेश भागवत यांची सनई व सुंदरी वादनाची कार्यशाळा होईल. शनिवारी सायंकाळी ७ वाजता पं. जितेंद्र अभिषेकी सघनगान शिक्षण केंद्राची विद्यार्थिनी सुहिता केरकर हिचे गायन, त्यानंतर पं. शैलेश भागवत यांचे शहनाई वादन व देवकी पंडित यांचे गायन होणार आहे, तर रविवारी सायंकाळी ७ वाजता पं. जितेंद्र अभिषेकी सघनगान शिक्षण केंद्राची विद्यार्थिनी योगिता रायकर हिचे गायन, त्यानंतर पं. मोहन दरेकर आणि पं. राजा काळे यांचे गायन होईल. त्यांना तबलासाथ दयेश कोसंबे व संवादिनी साथ राया कोरगावकर, उदय कुळकर्णी करणार आहेत. या संगीत महोत्सवाचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष वामन पंडित, सहकार्यवाह मंदार आळवे यांनी केले आहे. (वार्ताहर)