मुंबईकरांची गोव्याला अधिक पसंती
By Admin | Updated: November 5, 2014 23:38 IST2014-11-05T22:28:02+5:302014-11-05T23:38:46+5:30
जनशताब्दी, मांडवी एक्स्प्रेस दि. ३१ डिसेंबरपर्यंत या तिन्ही गाड्या हाऊसफुल्ल

मुंबईकरांची गोव्याला अधिक पसंती
चिपळूण : नाताळसह मावळत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दोन महिने अगोदरच मुंबईकर चाकरमान्यांनी रेल्वेचे आगाऊ आरक्षण केले आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्या हाऊसफुल्ल झाल्या आहेत.
मुंबईकर चाकरमानी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वाधिक पसंती गोव्याला देत असून, गेल्या पाच वर्षात नाताळसाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. दि. २६ ते ३० डिसेंबर या कालावधीत कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या हाऊसफुल्ल होणार आहेत.
सध्या या गाड्यांसाठी वेटिंगलिस्ट ३००च्या पुढे पोहोचली आहे. मुंबईतून गोव्याला जाण्यासाठी सर्वाधिक सोयीची गाडी म्हणून कोकणकन्या एक्स्प्रेसकडे पाहिले जाते. त्यामुळे ही गाडी काही तासातच हाऊसफुल्ल होते. जनशताब्दी, मांडवी एक्स्प्रेस या गाडीला पर्यटकांची मोठी पसंती आहे. दि. ३१ डिसेंबरपर्यंत या तिन्ही गाड्या हाऊसफुल्ल झाल्या आहेत. गाड्या हाऊस फुल्ल झाल्यामुळे प्रवाशांना तत्काळ तिकीटावर अवलंबून राहावे लागणार आहे. (वार्ताहर)