एमआरजीएसचे १ कोटीचे उद्दिष्ट
By Admin | Updated: July 25, 2014 22:51 IST2014-07-25T22:30:28+5:302014-07-25T22:51:24+5:30
पंचायत समिती सभा : गतवर्षी २४ लाखांची कामे

एमआरजीएसचे १ कोटीचे उद्दिष्ट
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर तालुके महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत पुढे असताना कणकवली तालुका मागे का? असा सवाल उपस्थित करतानाच यावर्षी १ कोटींच्या कामाचे उद्दिष्ट समोर ठेऊन काम करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत घेण्यात आला.
येथील पंचायत समितीच्या प.पू. भालचंद्र महाराज सभागृहात सभापती मैथिली तेली यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यावेळी गटविकास अधिकारी चंद्रसेन मकेश्वर, सहाय्यक गटविकास अधिकारी गवंडे उपस्थित होते. या सभेमध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या उद्दिष्टपूर्तीचा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत आला. तालुक्यात फक्त २४ लाखांचीच कामे गतवर्षी झाली आहेत. उद्दिष्टपूर्तीमध्ये इतर तालुक्यांपेक्षा कणकवली तालुका का मागे आहे? असा प्रश्न सुरेश सावंत यांच्यासह अन्य सदस्यांनी उपस्थित केला. एमआरजीएसबाबतची जबाबदारी सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांकडे दिली असल्याचे चंद्रसेन मकेश्वर यांनी सांगितले.
तर पंचायत समितीअंतर्गत अनेक पदे रिक्त असून एमआरजीएस अंतर्गत काम करताना मजुरांचीही कमतरता भासत असल्याचे सहाय्यक गटविकास अधिकारी गवंडे यांनी सांगितले. मात्र या योजनेच्या अंमलबजावणीत कणकवली तालुकाही पुढे असायला हवा, असे सांगत यावर्षी १ कोटीच्या कामांचे उद्दिष्ट समोर ठेऊन आतापासूनच नियोजन करा. त्यासाठी लागणारे सहकार्य आम्ही करू, असे यावेळी सदस्यांनी सांगितले.
तालुक्यात वारंवार वीजप्रवाह खंडीत होण्याच्या घटना घडत असून त्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी भिकाजी कर्ले तसेच सुरेश सावंत यांनी केली. श्री गणेश चतुर्थीपूर्वी गाव तिथे वायरमन देण्यात यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सरपंच, पंचायत समिती सदस्यांना तातडीने ओळखपत्र देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. शेतकऱ्यांना गोठे बांधून देण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. मात्र एका गावातील पाचच प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. त्यामुळे प्रस्ताव दिलेल्या इतर लोकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे यापुढे विविध योजनांअंतर्गत प्रस्ताव मागविताना जेवढे प्रस्ताव मंजूर होऊ शकतील तेवढेच मागविण्यात यावेत, अशी सूचना यावेळी सदस्यांनी केली. पंचायतराज समितीने आक्षेप घेतलेल्या ग्रामपंचायतींच्या कारभाराबाबत पुढील सभेत माहिती देण्यात यावी, अशी मागणी सुरेश सावंत यांनी केली.
तर या समितीच्या स्वागतासाठी गोळा करण्यात आलेल्या निधीबाबत बाबा वर्देकर यांनी प्रश्न उपस्थित केला. या निधीचा वापर झाला नसेल तर तो संबंधितांना परत करण्यात यावा, तसेच विनाकारण होणारी पंचायत समितीची बदनामी थांबवावी, असेही त्यांनी सांगितले.
नरडवे घोलणवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला सहावी तसेच सातवीचा वर्ग सुरू करण्याबाबत ठरावही या सभेत घेण्यात आला. तर तालुक्यातील रस्त्यावर पडलेले खड्डे गणेश चतुर्थीपूर्वी बुजविण्यात येतील, असे बांधकाम विभागाच्यावतीने सांगण्यात आले. (वार्ताहर)
बालमृत्यू रोखण्यासाठी अभियान
तालुक्यात पाच वर्षाखालील ६ हजार ४३८ मुले असून बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. फारूक देसाई यांनी दिली. तर अतिसारामुळे बालमृत्यू घडत असून ते रोखण्यासाठी तालुक्यात अतिसार निर्मूलन पंधरवडा राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. लेप्टोबाबत उपाययोजना सुरू असल्याची माहिती डॉ. देसाई यांनी दिली.
-पंचायत समिती कार्यालय आवारातील झाडांमुळे कार्यालयाची शोभा वाढत असून झाडे तोडल्यास हे कार्यालय कोंडवाडा वाटेल. त्यामुळे झाडे न तोडता धोकादायक असलेल्या फांद्या फक्त तोडण्यात याव्यात, असे सुरेश सावंत यांनी सुचविले. मात्र पंचायत समितीने झाडे तोडण्याबाबत यापूर्वीच ठराव घेतला असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. या मुद्यावर सदस्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर झाडे तोडण्याबाबत पुनर्विचार करण्याचे ठरविण्यात आले.