शिक्षक भारती संघटनेचे धरणे आंदोलन

By Admin | Updated: October 20, 2014 22:31 IST2014-10-20T21:07:09+5:302014-10-20T22:31:22+5:30

अतिरिक्त शिक्षक पदे कमी करण्याच्या आदेशाबाबत उच्च न्यायालयात घेतली धाव

The movement of teachers' association of Bharti organization | शिक्षक भारती संघटनेचे धरणे आंदोलन

शिक्षक भारती संघटनेचे धरणे आंदोलन

सिंधुदुर्गनगरी : माध्यमिक शिक्षकांची पगार बिले माध्यमिक शिक्षण विभागाकडून स्वीकारली जात नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी जिल्हा परिषद भवनासमोर सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारती संघटनेने एकदिवशीय धरणे आंदोलन छेडले.
शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षण विभागाने माध्यमिक शिक्षकांची अनेक पदे संच मान्यतेदरम्यान ३० सप्टेंबरच्या पटसंख्येनुसार अतिरिक्त ठरविली आहेत. अनेक शाळांतील शिक्षकांना कमी करण्याचे आदेशही दिले आहेत. माध्यमिक शिक्षण विभागाची ही कार्यपद्धती घटनाबाह्य असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्था चालक मंडळ पणदूर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्या अनुषंगाने प्राप्त परिस्थितीत सर्व शिक्षक पदे ‘जैसे थे’ ठरविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले असल्याने आणि त्यामुळे एकही शिक्षक अतिरिक्त ठरत नसल्याने आॅफलाईन पेमेंट पद्धतीचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
सर्वच वेतन आॅनलाईन पद्धतीने होणे अपेक्षित असताना शिक्षण विभागाच्या पगारपत्रके न स्वीकारण्याच्या मनमानी कारभाराचा निषेध करण्यात आला आहे. कमी करण्यात आलेल्या पदावरील कर्मचारी हे जसे आहेत त्याच स्थितीत राहणार आहेत.
त्यामुळे पगार होणे अपेक्षित असताना व कामाचा मोबदला हक्काने मिळणे गरजेचे असताना शिक्षण विभागाने सप्टेंबरची पगारपत्रके स्वीकारण्यास नकार दिल्याने निषेध म्हणून हे आंदोलन छेडण्यात आल्याचे शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी सांगितले. तसेच आंदोलनाची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशाराही निवेदनाद्वारे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना देण्यात आला.
यावेळी अध्यक्ष संजय वेतुरेकर, सुरेश चौकेकर, कमलेश गोसावी, अनिता सडवेलकर, रुपेश बांदेकर, शांताराम गावडे आदींसह अनेक माध्यमिक शिक्षकांचा आंदोलनात सहभाग होता. (प्रतिनिधी)

Web Title: The movement of teachers' association of Bharti organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.