डिझेल कोेट्यासाठी आंदोलन
By Admin | Updated: March 3, 2015 00:32 IST2015-03-02T23:11:52+5:302015-03-03T00:32:44+5:30
सर्जेकोट संस्था : कृष्णनाथ तांडेल यांची पालकमंत्र्यांवर टीका

डिझेल कोेट्यासाठी आंदोलन
मालवण : नवीन व जुन्या यंत्रनौकांचा वाढीव डिझेल कोटा अद्याप मंजूर न झाल्याने श्री भद्रकाली देवी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित मिर्याबांदा, सर्जेकोट या संस्थेतर्फे येथील मत्स्य व्यवसाय कार्यालयासमोर सोमवारी प्रातिनिधीक धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना मच्छिमार नेते कृष्णनाथ तांडेल यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना सध्या मच्छिमार समाज विविध समस्यांनी ग्रासलेला असताना पालकमंत्र्यांचे मच्छिमारांकडे दुर्लक्ष होत असून मच्छिमारांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना वेळ नाही अशी टीका केली.
या धरणे आंदोलनात कृष्णनाथ तांडेल यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष गोपीनाथ तांडेल, संचालक नागेश परब, शरद धुरी, सुहास आडकर, रामकृष्ण जोशी, महेश पराडकर, भगवान मुंबरकर, सुभाष लोणे, दिनानाथ धुरी, संतोष रेवंडकर, मुरारी सावंत, विष्णू जामसंडेकर, दीपेश मायबा, राजेश गोवेकर, देवेंद्र शेलटकर, श्रीकांत परब, रजनिकांत देऊलकर, शरद आचरेकर, प्रफुल्ल धुरी, गुरुनाथ खवणेकर, रोहिदास लोणे, ध्रुवबाळ फोंडबा, हेमंत मेतर, रामदास धुरी आदी मच्छिमार सहभागी झाले होते.
यावेळी तांडेल म्हणाले, आज मच्छिमार अनेक समस्यांनी ग्रासल आहेत. डिझेल कोटा मंजूर न झाल्याने यांत्रिक नौकाधारक मच्छिमार अडचणीत आला आहे. जिल्ह्याच्या किनारपट्टीवर परप्रांतीय ट्रॉलर्स धुमाकूळ घालून मासळी चोरून नेत आहेत. मत्स्य विभागाची समुद्रात कोणतीही गस्त नसल्यानेच परप्रांतीय ट्रॉलर्सचे फावले आहे.
तसेच मच्छिमारांचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे रखडलेले आहेत. समुद्राच्या उधाणामुळे मच्छिमारांच्या घरांना धोका निर्माण झाला असताना किनारपट्टीवर धूप प्रतिबंधक बंधारा कम रस्ता असा जोडप्रकल्प होणे गरजेचे असून मच्छिमार मागणी करीत असतानाही शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच सीआरझेडपासून मच्छिमारांना सूट मिळावी, प्रत्येक मच्छिमारी सहकारी संस्थेने केलेली अंडरग्राऊंड डिझेल पंप देण्याची मागणी अशा विविध मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. म्हणून आम्ही प्रातिनिधीक धरणे आंदोलन करीत आहोत असेही कृष्णनाथ तांडेल म्हणाले. (प्रतिनिधी)
भाजपा-शिवसेना नेते गप्प का?
बदलत्या हवामानामुळेही मासेमारीवर विपरीत परिणाम होत आहे. अशा अनेक समस्यांमध्ये मच्छिमार भरडला जात असताना जिल्ह्याचे पालकमंत्री असणाऱ्या दीपक केसरकर यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. माजी पालकमंत्री नारायण राणे यांनी मच्छिमार समाजाच्या उन्नतीसाठी विधानसभेत आवाज उठवून व पाठपुरावा करून अनेक समस्या सोडविल्या. सत्तेत नसताना मच्छिमारांच्या प्रश्नांवर पेटून उठणारे भाजपा-शिवसेनेचे नेते आता गप्प का? सध्याच्या पालकमंत्र्यांना मच्छिमारांच्या प्रश्नांना वाचा फोडून शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी वेळ नाही. तसेच मच्छिमार व्यवसायाकडे पालकमंत्र्यांचा उदासीन दृष्टीकोन असल्याचे दिसून येते असेही तांडेल म्हणाले.