इचलकरंजी पालिकेत समित्यांसाठी हालचाली
By Admin | Updated: November 11, 2014 00:04 IST2014-11-10T21:01:38+5:302014-11-11T00:04:19+5:30
इच्छुकांत रस्सिखेच : पाणीपुरवठा, बांधकामसाठी जोरदार स्पर्धा

इचलकरंजी पालिकेत समित्यांसाठी हालचाली
राजाराम पाटील - इचलकरंजी -विधानसभा निवडणूक आणि दीपावलीनंतर आता नगरपालिकेतील राजकारणाला वेग येऊ लागला असून, विविध विषय समित्यांच्या आगामी निवडणुकींच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कॉँग्रेसमध्ये पाणीपुरवठा समितीसाठी, तर राष्ट्रवादीमध्ये बांधकाम समितीसाठी इच्छुकांची स्पर्धा आहे. दरम्यान, कॉँग्रेसकडून बांधकाम समितीची मागणी करण्याच्या हालचाली सुरू असून, त्या बदल्यात राष्ट्रवादी उपनगराध्यक्षपद मागण्याच्या पवित्र्यात आहे.
पालिकेमध्ये कॉँग्रेसचे २९, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ११ व शहर विकास आघाडीचे १७ नगरसेवक आहेत. कॉँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी सत्तेवर आहे. सत्तेतील वाटपानुसार कॉँग्रेसकडे पाणीपुरवठा, आरोग्य समिती व महिला-बालकल्याण समित्या आहेत. राष्ट्रवादीकडे बांधकाम व शिक्षण समिती आहे. या समित्यांची एक वर्षाची मुदत डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात संपुष्टात येत आहे.
विधानसभा निवडणूक कालावधीत आचारसंहितेमुळे पालिकेतील राजकारण ठप्प होते, तर या निवडणुकीपाठोपाठ आलेल्या दीपावली सणामुळे पालिकेतील हालचाली थंडावल्या होत्या. आता आगामी डिसेंबर महिन्यामध्ये येणाऱ्या विविध विषय समित्यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय हालचालींना पुन्हा वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये बदललेले संदर्भ पाहता राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. यापैकी जांभळे गटाकडे सहा व कारंडे गटाकडे पाच नगरसेवक आहेत. आतापर्यंत बांधकाम समिती जांभळे गटाकडेच असल्याने आता कारंडे गटास बांधकाम समिती मिळावी, अशी मागणी पुढे
येत आहे. बांधकाम समिती कारंडे गटाकडे गेल्यास पालिकेतील जांभळे गटाचे वर्चस्व संपुष्टात येण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. विधानसभेला प्रकाश आवाडे यांना हार पत्करावी लागली; पण निवडणुकीमध्ये आवाडे यांना ज्या परिसराने मताधिक्य दिले,
त्या परिसरातील नगरसेवकाला समित्यांचे सभापतिपद देण्याचा विचार पक्षश्रेष्ठींकडून करण्यात येत आहे. त्यादृष्टीने पालिकेचे राजकीय संदर्भ बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.