मोटारसायकल सफर लवकरच पर्यटकांच्या सेवेला
By Admin | Updated: February 8, 2016 00:57 IST2016-02-07T21:08:39+5:302016-02-08T00:57:20+5:30
दीपक माने यांची माहिती : खासगी कंपनीशी करार

मोटारसायकल सफर लवकरच पर्यटकांच्या सेवेला
सिंधुदुर्गनगरी : महाबळेश्वर आणि पाचगणीप्रमाणेच आता सिंधुदुर्गातही पर्यटकांना मोटारसायकलचा आनंद घेता येणार आहे. यासाठी प्रक्रिया आता शासनस्तरावर सुरू झाली असून, यासाठी एका खासगी कंपनीशी करार करण्यात आला आहे. ही मोटारसायकल सफर आता लवकरच सिंधुदुर्गाच्या सेवेत दाखल होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास सिंधुदुर्गचे प्रकल्प अधिकारी दीपक माने यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाची भुरळ देशाबरोेबरच परदेशी पर्यटकांनाही पडली आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात अजूनही मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून पर्यटकांसाठी सिंधुदुर्ग पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने ‘टूर आॅन टू व्हीलर’ ही योजना अमलात आणणार आहे.महाराष्ट्रात महाबळेश्वर आणि पाचगणी या ठिकाणी पर्यटन सफर योजना सुरू करण्यात येणार आहे. यासाठी एका खासगी कंपनीशी करार करण्यात आला असून, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन यांनी पुढाकार घेतला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांच्या सोयीसाठी निवास व न्याहरी योजना राबविण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६२ निवास न्याहरी असून आता पर्यटकांना राहण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी या सर्व न्याहरी आता आॅनलाईन करण्यात आल्या असून या सर्वांची माहिती आता पर्यटन विभागाच्या वेबसाईटवर प्रसारित करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक निवास न्याहरी प्रकल्पाच्या ठिकाणी ए.सी., नॉन ए.सी.बाबत आकारण्यात येणारे भाडे, आदींची माहिती पर्यटन विभागाच्या संकेतस्थळावर नागरिकांना मिळणार आहे. त्यामुळे भारतासह विदेशातील पर्यटकांना या सर्व निवास न्याहरी योजनांमध्ये बुकिंग करता येणार आहे. या आॅनलाईनसाठीची कार्यशाळा या जिल्ह्यात मालवण, कसाल आणि वेंगुर्ला या तीन ठिकाणी घेण्यात आल्या होत्या, अशी माहिती माने यांनी दिली. (प्रतिनिधी)
असे असणार भाड्याचे दर
सिंधुदुर्गातील हिल निसर्ग, स्टेशन, समुद्र किनारे, आदींची मोटारसायकलच्या माध्यमातून सफर करण्यासाठी विविध कंपन्यांच्या मोटारसायकली विविध पर्यटन विभाग ठेवणार असून, या मोटारसायकली बुकिंगसाठी प्रतिमोटारसायकल १००० रुपये घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या मोटारसायकली जे पर्यटक घेऊ न जातील त्या पर्यटकांना प्रती मोटारसायकल स्वत: पेट्रोल भरून १७५ रुपये १२ तासांसाठी अशाप्रकारे देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर १२ तासांत जर ही गाडी परत आणून दिली नाही, तर प्रतितास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे दीपक माने यांनी सांगितले.