सासू-सून ओवासली एकाचवेळी
By Admin | Updated: September 4, 2014 00:05 IST2014-09-03T23:00:15+5:302014-09-04T00:05:39+5:30
शिवापूर येथील प्रकार : बेळणेकर कुटुंबामध्ये दुर्मीळ क्षण

सासू-सून ओवासली एकाचवेळी
माणगाव : हिंदू संस्कृतीतील रितीरिवाजाप्रमाणे पहिल्याच वर्षी नवीन जोडपे गौरी गणपतीला ओवासणी करतात. वंश वेल वाढावी, या भावनेतून ही परंपरा फार वर्षांपासून चालत आली आहे. शिवापूर येथील बेळणेकर कुटुंबीय नोकरी धंद्यानिमित्त मुुंबईला स्थायिक झाले आणि सुरेखा बेळणेकर यांनी तब्बल ३५ वर्षांनंतर सुनेसोबत ओवासणी केली. सासू सुनेने एकाचवेळी ओवासणे, हा तसा दुर्मीळ मानला जाणारा क्षण असतो.
प्रत्येक घराण्याच्या मूळ घरामध्ये गौरी पूजन करून त्या घराण्यातील सुहासिनी ओवासणे हा सौभाग्याचे लेणे म्हणून वाण वाटतात. आजकाल सुरू झालेल्या विभक्त कुटुंब पद्धतीला एकत्र आणणारा हा सण आहे. कुटुंबातील विभक्त झालेल्या परस्परांतील दुरावा कमी करण्याचे काम या सणामुळे होत आहे.
शिवापूर येथील सुरेखा भगवान बेळणेकर यांचे १९८९ साली लग्न झाल्यानंतर काही कारणास्तव ओवासणे राहून गेले. त्यानंतर आज तब्बल ३५ वर्षांनी सुरेखा बेळणेकर यांनी सुनेसोबत ओवासण्याचा कार्यक्रम केला. लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षी ओवासणे शक्य झाले नसल्यास त्यानंतर मुहूर्त काढावा लागतो. एखाद्या वेळीस मूल झाल्यास त्याला ओवासता येत नाही. दोन मुले झाल्यानंतर ओवासता येते, अशा प्रत्येक गावात विविध रुढी परंपरा आहेत. त्यांचे पालन आजही केले जाते. अशा रुढीपरंपरांमुळेच सुरेखा यांची राहिलेली ओवासणी सून शीतल उमेश बेळणेकर यांच्यासोबत धार्मिक वातावरणात पार पडली. सासू-सून एकाचवेळी ओवासण्याचा हा अपवादात्मक घडणारा प्रसंग
आहे. (प्रतिनिधी)