‘कारवी’ ठरतेय आकर्षण
By Admin | Updated: September 23, 2014 00:17 IST2014-09-22T22:46:33+5:302014-09-23T00:17:18+5:30
आंबोलीतील निसर्गसौंदर्य : सात वर्षांनी जन्म घेत पुन्हा बहर

‘कारवी’ ठरतेय आकर्षण
महादेव भिसे-आंबोली -आंबोलीतील निसर्गसौंदर्यांला जणू देवाचेच वरदान आहे. येथील दऱ्यांखोऱ्यांमध्ये अनेक जैवविविधतेची गुपिते दडलेली आहेत. त्यामुळे येथे कोणत्याही मौसमात पर्यटकांना काहीना काही आकर्षण अनुभवयास मिळते. अशाप्रकारे सध्या आंबोली परिसरात तब्बल सात वर्षांनी जन्म घेणारी कारवी ही वनस्पती दिसून येत आहे. आंबोली घाटमार्गावर बहरलेल्या या कारवीने पर्यटकांना आकर्षित केले असून कारवीच्या या निळ्या गुलाबी सतरंंजी पसरलेल्या जंगलभागावरुन पर्यटकांची नजर हटत नसल्याचे चित्र दिसत आहे.
आंबोली परिसरात सध्या निसर्गाच्या विविध रंगछटांची मुक्त हस्ताने उधळण होताना दिसत आहे. घाट उतारावर व आंबोलीतील संपूर्ण जंगलामध्ये आढळणाऱ्या ^‘कारवी’ या झुडूपस्वरूपी वनस्पतीला तब्बल सात वर्षांनी फुले आलेली पहायला मिळत आहेत. निळ्या, गुलाबी रंगांमध्ये फुलणारी ही फुले निसर्ग पर्यटनाचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. संपूर्ण घाट उतारावर जणू निळ्या, गुुलाबी रंगाची झालरच पांघरल्यासारखा भास होत आहे. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या गाड्या आवर्जून घाटात थांंबून या कालवीच्या फुलांचे छायाचित्रण करताना दिसत आहेत.