गणेशोत्सवासाठी रत्नागिरीतून जादा गाड्या
By Admin | Updated: July 25, 2014 22:50 IST2014-07-25T22:24:46+5:302014-07-25T22:50:37+5:30
२४ आॅगस्टपासून या गाड्या सोडण्यात येणार

गणेशोत्सवासाठी रत्नागिरीतून जादा गाड्या
रत्नागिरी : कोकणामध्ये गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत असल्यामुळे मुंबईकरांच्या सोयीसाठी रत्नागिरी विभागाकडून ७५ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. २४ आॅगस्टपासून या गाड्या सोडण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने गावाकडे परततात. कोकण रेल्वेच्या गाड्यांचे आरक्षण आधीच फुल्ल झाले आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या सोयीसाठी रत्नागिरी विभागाने जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. विभागातील नऊ आगारातून एकूण ७५ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. दापोली आगारातून मुंबई, बोरिवली, ठाणे, भार्इंदर, कल्याण, नालासोपारा मार्गावर सात जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. खेड आगारातून बोरिवली, मुंबई, भांडुप, कल्याण, ठाणे, पुणे मार्गावर दहा जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. चिपळूण आगारातून मुंबई, स्वारगेट, पुणे, चिंचवड, बोरिवली मार्गावर आठ, तर गुहागर आगारातून मुुंबई, बोरिवली, भांडुप, परेल, ठाणे, विरार, विठ्ठलवाडी मार्गावर अकरा जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. देवरुख आगारातून बोरिवली, मुंबई, स्वारगेट मार्गावर आठ, तर रत्नागिरी आगारातून बोरिवली, मुंबई, पुणे मार्गावर पाच, लांजा आगारातून सहा जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. राजापूर आगारातून बोरिवली, नालासोपारा, मार्गावर दहा, तर मंडणगड आगारातून मुंबई, बोरिवली, नालासोपारा, भार्इंदर, परळ मार्गावर पाच जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. एकूण रत्नागिरी विभागातून ७५ गाड्या मुंबईत सोडण्यात येणार आहेत. तेथून मुंबईकरांना घेऊन या गाड्या प्रत्येक आगारामध्ये व जवळच्या ग्रामीण भागात दाखल होणार आहेत.
राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे आॅनलाईन आरक्षण सुविधा सुरु आहे. याशिवाय ग्रुप बुकिंगदेखील करण्यात येत आहे. येणाऱ्या गाड्यांचे नियोजन २४ ते २९ आॅगस्टपर्यंत करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)