मोदी सरांचा तास बुडाला
By Admin | Updated: September 5, 2014 23:30 IST2014-09-05T22:27:50+5:302014-09-05T23:30:31+5:30
कणकवली अत्यल्प प्रतिसाद : शाळेच्या सुट्टीचा फटका

मोदी सरांचा तास बुडाला
कणकवली : शिक्षक दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रसारीत होणारे भाषण सर्व विद्यार्थ्यांना ऐकवण्याचा घाट घालण्यात आला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या सुट्टीमुळे अनेक विद्यार्थ्यांचा हा तास बुडाला. यावर पर्याय म्हणून पंतप्रधानांचे रेकॉर्ड केलेले भाषण शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना दाखवण्यात येणार आहे.
पंतप्रधान थेट संवाद साधणार असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांचे भाषण ऐकावे यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली होती. तसा लेखी आदेश शिक्षण उपसंचालकांकडून जिल्हा परिषदेमार्फत प्रत्येक शाळेला पाठविण्यात आला होता. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवाची सुट्टी ८ सप्टेंबरपर्यंत आहे. त्यामुळे या उपक्रमासाठी विद्यार्थी जमवण्यासाठी बैठका घेत नियोजन करण्यात आले. शाळेनजीकच्या विद्यार्थ्यांना बोलवण्याचे नियोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांवर हे भाषण पाहण्याची सक्ती नसल्याचा खुलासा केंद्रीय स्तरावरून करण्यात आल्यानंतरही तसे पत्र प्राप्त न झाल्याने शिक्षण विभागाने पूर्वीच्या आदेशाने नियोजन केले होते.
सुट्टीमुळे भाषणाला विद्यार्थ्यांचा अत्यल्प प्रतिसाद लाभला. यावर उपाय म्हणून पंतप्रधानांचे मुद्रीत भाषण शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ऐकविण्यात येणार आहे. दरम्यान, शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा लाभला आदी बाबींचा अहवाल देण्यास सांगण्यात आले होते. हा अहवालही शिक्षकांकडून सादर करण्यात आला. (प्रतिनिधी)
टीव्ही बंद
अनेक शाळांमध्ये टीव्ही संच जुनेपुराणे झालेले असून त्यांची दुरूस्ती न झाल्याने बंद होते. त्यामुळे काही शाळांमध्ये संगणक मॉनिटरवर हे भाषण दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर काही ठिकाणी शाळेनजीक घरामध्ये विद्यार्थ्यांना जमवून हे भाषण दाखवण्यात आले. गणेशोत्सवाची सुट्टी असल्याने अर्थातच या उपक्रमाला अत्यल्प प्रतिसाद लाभला.