मोदी प्रचारसभेसाठी गल्लीगल्लीत : कदम
By Admin | Updated: October 13, 2014 23:04 IST2014-10-13T22:02:43+5:302014-10-13T23:04:43+5:30
मतदारच गिळंकृत करणार आहेत

मोदी प्रचारसभेसाठी गल्लीगल्लीत : कदम
कसई दोडामार्ग : शिवसेनेचे अस्तित्व संपविण्याचा विडा उचलेल्या राणेंना या निवडणुकीत मतदारच गिळंकृत करणार आहेत तर मोदी देशाचे पंतप्रधान असल्याचे विसरुन गल्लीगल्लीत मते मागत फिरत आहेत, असे प्रतिपादन शिवसेनेचे माजी विरोधीपक्ष नेते रामदास कदम यांनी करत विरोधकांवर चौफेर टीका केली. दोडामार्ग येथे शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारसभेत रामदास कदम यांची तोफ धडाडली. यावेळी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब, जान्हवी सावंत, बाबुराव धुरी, अनारोजीन लोबो, प्रकाश रेडकर, संजय गवस, संजय देसाई, प्रदीप नाईक, प्रज्ञा नाईक, रमेश नाईक, राजू नाईक, विश्वाप्पा देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कदम यांनी नारायण राणे, नरेंद्र मोदी, राजन तेली, अमित शहा यांच्यावर जहरी टीका केली. कोकणी माणसानेच शिवसेना मोठी केल्याने शिवसेनेचा विजय निश्चित असून विरोधकांचे डिपॉझिट जप्त होणार आहे.
नारायण राणेंनी १५ वर्षात विकास केला तो आपल्या मुलांचा. त्यामुळेच त्यांच्याकडे अनेक बंगले असल्याचा टोलाही कदम यांनी लगावला. राणे सेना संपविणार होते. मात्र, आज स्वत:च संपणार आहेत. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याने त्यांना जेलची हवा चाखायला लावणार आहे. भाजपाचे अमित शहा शिवसेनेला उंंदीर म्हणतात. पण जसा अफझलखानाचा शिवाजी महाराजांनी कोथळा काढला, तसाच हा उंदीर कोथळा काढेल, अशी टीका भाजपावर केली. पाकिस्तान आपल्या देशावर हल्ला करीत असताना पंतप्रधान मोदी मात्र ग्ाल्ली गल्लीत मते मागत फिरत आहेत, अशा शब्दात मोदींचाही समाचार घेतला. धनुष्य तुमच्या हातात दिले आहे, या सर्व शत्रूंचा नाश करा, असे कदम यांनी आवाहन केले. (वार्ताहर)