मनसेच्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास गप्प बसणार नाही

By Admin | Updated: November 30, 2014 00:50 IST2014-11-30T00:42:51+5:302014-11-30T00:50:47+5:30

परशुराम उपरकर : ‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाई करा

MNS workers will not be silent if they are harassed | मनसेच्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास गप्प बसणार नाही

मनसेच्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास गप्प बसणार नाही

सावंतवाडी : सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून वनविभागाने आडाळी येथे मायनिंग उत्खनन करण्यास परवानगी दिली आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असून यावर पांघरून घालण्यासाठी आमच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अडचणीत आणून नसलेले गुन्हे दाखल केले जात आहेत. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही, असा इशारा मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिला आहे.
ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब उपस्थित होते. यावेळी मनसे नेते माजी आमदार परशुराम उपरकर म्हणाले, मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असून अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यामागे एखाद्या पक्षाचा आवाज दाबणे हाच हेतू होतो. पण आम्ही गप्प बसणार नाही. वनक्षेत्रपाल संजय शिदे यांचे निलंबन होईपर्यंत मनसे या ना त्या मार्गाने आपले आंदोलन सुरूच ठेवणार आहे. आम्ही स्वत:साठी गेलो नव्हतो. जनतेच्या प्रश्नासाठी गेलो होतो. मग एखाद्या घटनेनंतर तब्बल आठवड्याने गुन्हे दाखल करण्याचा हेतू काय, असा सवालही उपरकर यांनी केला आहे.
आडाळी येथे वनजमिनीत मोठ्या प्रमाणात मायनिंग उत्खनन केले गेले आहे. त्यावर कोणाचा लक्ष नाही. सर्वोच्च न्यायालयाचे सर्व आदेश या अधिकाऱ्यांनी धुळीस मिळवले, मग याच्यावर कारवाई व्हायला नको का? सिंधुुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. वनजमिनी तर लाकूड व्यापाऱ्यांनी गिळंकृत केल्या आहेत, त्यावर हे अधिकारी गप्प का, असा सवाल केला आहे. तसेच याप्रश्नी वरिष्ठ पातळीवरही न्याय मागणार असून ही सर्व वस्तुस्थिती उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांच्या कानावर घातली असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: MNS workers will not be silent if they are harassed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.