मनसेने निवडणुका लढवाव्या
By Admin | Updated: July 21, 2014 23:21 IST2014-07-21T23:15:06+5:302014-07-21T23:21:05+5:30
कार्यकर्त्यांची मागणी : पक्षनिरीक्षकांची सिंधुदुर्गात बैठक

मनसेने निवडणुका लढवाव्या
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनसेच्यावतीने निवडणुका लढविण्यात येत नसल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून यामुळे कार्यकर्ते विखुरले जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यात निवडणुका लढविण्यात याव्यात.
यासाठी कुडाळ, मालवण विधानसभा मतदार संघात उमेदवार उभा करण्याची मागणी मनसेचे कुडाळ, मालवण मतदार संघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शनिवारी झालेल्या पक्षनिरीक्षकांच्या बैठकीत केली. मनसेतर्फे उमेदवारीसाठी हेमंत जाधव, शिरीष सावंत यांच्यासह तिघांची नावेही यावेळी सूचविण्यात आली.
मात्र, पक्षनिरीक्षकांची बैठक असूनही राजीनामा दिलेल्या दाभोलकर गटातील पदाधिकारी उपस्थित नसल्याने हा चर्चेचा विषय ठरला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने चाचपणी करण्यासाठी कुडाळ, मालवण विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक पक्षनिरीक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
यावेळी पक्षनिरीक्षक शिवाजी नलावडे, आमदार नितीन सरदेसाई, पुणे मनसे नेते दीपक पायगुडे, कोकण विभाग संपर्कप्रमुख परशुराम उपरकर, जयप्रकाश बाविस्कर, कोकण संपर्कप्रमुख शिरीष सावंत, धीरज परब, महिला जिल्हाध्यक्ष भारती रावराणे, चैताली भेंडे, जिल्हा संपर्कप्रमुख चेतन कदम, कुडाळ तालुकाध्यक्ष बाबल गावडे, महिलाध्यक्ष सुवर्णा मुंज, मालवण तालुकाध्यक्ष नारायण कुबल आदी उपस्थित होते.
या बैठकीला राजीनामा दिलेल्या गटातील माजी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, उपजिल्हाध्यक्ष राजेश पडते, प्रसाद गावडे यांच्यासह काही पदाधिकारी व कार्यकर्ते अनुपस्थित असल्याने बैठकीच्या ठिकाणी याबाबत उलटसुलट चर्चा सुरू
होती. (वार्ताहर)
राज ठाकरेंचे सिंधुदुर्गकडे दुर्लक्ष
--- यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात पदाधिकारी निहाय आढावा घेण्यात आला. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी आपल्या नाराजीच्या भावना व्यक्त केल्या. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यावर दुर्लक्ष केले जात आहे. मनसेच्यावतीने निवडणुका लढविल्या जात नसल्याने कार्यकर्ते विखुरले जात आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कुडाळमधून कोकण संपर्क नेते शिरीष सावंत, हेमंत जाधव, बाळा पावसकर यांना उमेदवारी द्यावी, असे सूचविण्यात आले. या मतदार संघातील विविध समस्यांचा आढावा घेत असताना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी या मतदार संघात विकासात्मक प्रकल्प होत नसल्याने जनतेमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचे सांगितले. सध्याचे राजकीय घडामोडींचे वातावरण मनसेसाठी पोषक असून त्या अनुषंगाने याबाबत गांभीर्याने विचार व्हावा, असे मत व्यक्त करण्यात आले.