सर्वांना मनसे हाच पर्याय : उपरकर
By Admin | Updated: July 18, 2014 23:14 IST2014-07-18T23:01:14+5:302014-07-18T23:14:34+5:30
सत्ता आणि पद डोळ्यासमोर ठेवून

सर्वांना मनसे हाच पर्याय : उपरकर
कणकवली : पालकमंत्री नारायण राणे यांचे कॉँग्रेसमधील राजीनामा नाट्य असो की आमदार दीपक केसरकर यांचा शिवसेनाप्रवेश हे दोन्ही बदल सत्ता आणि पद डोळ्यासमोर ठेवून करण्यात येत असल्याची टीका करतानाच सर्वांना मनसे हाच योग्य पर्याय असल्याचे प्रतिपादन मनसेचे कोकण विभागीय संघटक परशुराम उपरकर यांनी केली आहे. येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संपर्कप्रमुख चेतन कदम उपस्थित होते.
उपरकर म्हणाले की, सध्या जिल्ह्यात सर्वच पक्षांत इकडून तिकडे धावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. तरीही राजकीय नेत्यांना मनसे हा एकमेव पर्याय आहे. कोकण विकासासाठी मनसे हाच पर्याय राहणार असून ‘राजकीय भूकंप’ सत्ता व पदासाठी होत आहेत.
सत्तेतील आमदार केसरकर आपल्या मंत्र्यांकडून काम करून न घेता कॉँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता जाणार असल्यानेच दहशतवादाची ओरड करून धावाधाव करत आहेत. अर्थ, पाटबंधारे, ग्रामविकास आदी महत्त्वाची खाती आमदार केसरकर यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसकडेच होती. विरोधी बाकावर असतानाही आम्ही जिल्ह्यातील अनेक प्रश्न मार्गी लावले. मात्र, आमदार केसरकर यांच्याकडून विकासकामात अडथळे आणले जात हंोते.
तिलारी धरणप्रश्नी वनटाईम सेटलमेंटचे आंदोलन शरद पवार आणि आमदार केसरकर यांनी दोनदा मागे घ्यायला लावले. ग्रामसभा न घेणे, ग्रामस्थांकडून अधिकार हिरावून घेणे हे प्रकार होत होते. सर्व प्रयत्न करूनही राष्ट्रवादीकडून केसरकर यांना लालबत्ती मिळाली नाही. शिवसेनेने मधाचे बोट लावून पक्षप्रवेश करत असलेल्या केसरकर यांचा ‘राणेंचा दहशतवाद’ हा विचार नौटंकी असल्याची टीका, उपकरकर यांनी केली.
दहशतवादाच्या व्यासपीठावर कर्नल सुधीर सावंत, संदेश पारकर, पुष्पसेन सावंत एकत्र होते. तेव्हा आम्ही नारायण राणेंसोबत असताना केसरकर राणेंच्या केबिनबाहेर असायचे त्यावेळपासून आतापर्यंत दहशतीची स्थिती बदललेली नाही, हे केसरकर यांनी लक्षात घ्यावे.
नारायण राणेंची राजकीय भूकंपाची भाषा म्हणजे भविष्यातील सत्ताबदलाची बेगमी आतापासून केली जात आहे. राज ठाकरे यांनी यापूर्वी नारायण राणे मनसेत चालतील मात्र त्यांची मुले नाही, असे सांगितले होते. राणेंना मनसेत प्रवेश दिल्यास राज यांचा आदेश पाळू, अशी उपरकर यांनी भूमिका मांडली. (प्रतिनिधी)