मनसेतर्फे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
By Admin | Updated: November 16, 2014 23:47 IST2014-11-16T21:43:04+5:302014-11-16T23:47:16+5:30
बंद प्रकल्पांना ऊर्जितावस्था द्या

मनसेतर्फे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील शिवउद्यान, म्युझियम, रघुनाथ मार्केट तसेच अन्य बंद पडलेल्या प्रकल्पांच्या दुरवस्थेबाबत मनसे महिला जिल्हाध्यक्षा चैताली भेंडे यांनी मुख्याधिकारी विजयकु मार द्वासे यांना निवेदन सादर केले. हे बंद पडलेले प्रकल्प सुरू करून मोडकळीस आलेल्या साहित्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी मनसे महिला जिल्हाध्यक्षा चैताली भेंडे, श्रेया देसाई, आयरिन डिसा, आर. के. खानोलकर आदी उपस्थित होते. शहरातील जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, उभाबाजार येथील उद्यान तसेच नरेंद्र डोंगर येथील उद्यान या बालोद्यानामध्ये असलेली खेळणी मोडकळीस आली आहेत. त्यामुळे लहान मुलांची गैरसोय होत आहे. यासोबतच बागमध्ये असणारे म्युझियमही बंदावस्थेत आहे. तसेच शहरातील रघुनाथ मार्केट, शिल्पग्राम अशा प्रकारचे प्रकल्प गेले कित्येक दिवस बंदावस्थेत आहेत. त्यामुळे पर्यटकांची ही गैरसोय निर्माण होऊन सावंतवाडीच्या पर्यटनावर याचा परिणाम होत आहे. हे बंद प्रकल्प लवकरात लवकर सुरू करावेत, अशी मागणी मनसेतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावर मुख्याधिकारी द्वासे मी काही दिवसांपूर्वीच सावंतवाडीचा पदभार स्वीकारला आहे. लवकरात लवकर या बंद प्रकल्पांबाबत अहवाल घेऊन लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. (वार्ताहर)