किरकोळ वादातूृन मित्राचा निर्घृण खून
By Admin | Updated: October 3, 2015 22:54 IST2015-10-03T22:54:35+5:302015-10-03T22:54:35+5:30
तळवली येथील घटना : संशयितास तत्काळ अटक

किरकोळ वादातूृन मित्राचा निर्घृण खून
गुहागर : दोघा मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून मुकेश गोविंद पवार (वय २५, रा. तळवली) याचा धारदार हत्याराने खून झाल्याची घटना गुहागर तालुक्यातील तळवली बागकर स्टॉप येथे शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी मुकेशचा मित्र समीर ऊर्फ लाडू विनायक पवार (२६, तळवली, बौद्धवाडी) याला गुहागर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ७ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुकेश आणि समीर यांची गेली अनेक वर्षे मैत्री होती. मुकेश ग्लोबल ट्रॅव्हल्सच्या बसवर क्लिनर म्हणून काम करीत होता, तर समीर गावातच वाहनचालक म्हणून काम करतो. शुक्रवारी घटनेच्या दोन तास आधी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये किरकोळ वाद झाला होता. या वादातून मुकेशने समीरच्या कानाखाली मारले होते. सायंकाळी जोरदार पाऊस पडू लागला होता. रात्री ८.३० वाजता विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू होता. बाजारपेठेतील दुकानेही बंद करण्यात आली होती.
यादरम्यान काळोखाचा फायदा घेत समीरने मुकेशच्या मानेवर धारदार सुऱ्याने वार केला. त्याच अवस्थेत मुकेश दहा-पंधरा पावले पळत ‘मला वाचवा, डॉक्टरकडे न्या’ असे ओरडत समोर येऊन कोसळला. काही दुकानदार व नागरिकांनी हे पाहिल्यानंतर पोलीसपाटील विनोद पवार तसेच गुहागर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक विनित चौधरी, अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांसह दाखल झाले.
या घटनेनंतर समीर पवार घरी गेला. घराबाहेर असलेल्या वाळूच्या ढिगाऱ्यात सुरा लपवून ठेवला आणि रक्ताने माखलेले कपडे टपात पाणी घेऊन साफ केले. यानंतर काही घडलेच नाही, अशा आविर्भावात तो झोपला. घटनेचा माग घेत रात्रीच गुहागर पोलीस त्याच्या घरी पोहोचले आणि समीरला ताब्यात घेतले.
समीरने आपला गुन्हा कबूल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शनिवारी सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे हेही घटनास्थळी पोहोचले. विच्छेदनानंतर मुकेशचा मृतदेह शनिवारी नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. पोलीस निरीक्षक विनित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. (वार्ताहर)