आराखड्याबाबत जनतेची पालिकेकडून दिशाभूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2016 00:02 IST2016-03-24T21:53:07+5:302016-03-25T00:02:08+5:30
मोंडकर यांचा आरोप : भाजपकडून जनतेला न्याय देऊ

आराखड्याबाबत जनतेची पालिकेकडून दिशाभूल
मालवण : मालवण शहर विकास आराखड्याबाबत पालिकेतील काँग्रेस नगरसेवकांकडून जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. मुळात आराखडा रद्दचा ठराव हा पालिका नियमावलीच्या बाहेर घेण्यात आला. त्यानंतर या आराखड्याला मुदतवाढ अपेक्षित असताना आगामी पालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जनतेतून होणारी नाराजी लक्षात घेता आराखड्याला पालिकेने मुदतवाढ नाकारली आहे, असा आरोप भाजप तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केला. दरम्यान, भाजप मालवण शहरवासीयांसोबतच असून आगामी पालिका निवडणूकही भाजपची असेल. त्यामुळे जनतेला अपेक्षित आराखडा साकारला जाईल, असा विश्वास मोंडकर यांनी व्यक्त केला. येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत राजू आंबेरकर, शहर अध्यक्ष बबलू राऊत, महेश मांजरेकर, दादा वाघ, पूर्वा ठाकूर, गजानन ठाकूर आदी उपस्थित होते. आराखड्याबाबत जे रचनाकार मुदतवाढ मागत आहेत त्यांची नियुक्ती पालिकेनेच केली आहे. त्यामुळे आराखड्याबाबत अपयशी ठरलेली पालिका सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
शिष्यवृत्तीबाबत आठ दिवसांत निर्णय
मालवण तालुक्यात चौथीच्या काही विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती चार वर्षे रखडली आहे. याबाबत वृत्तपत्रातून बातमी प्रसिद्ध होताच भाजपच्यावतीने तालुकास्तरावर पाठपुरावा करून जिल्हा शिक्षण विभागाकडे माहिती मागविण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देताना प्रशासनस्तरावर रखडली असल्यास तसेच याला कोणी अधिकारी वर्ग जबाबदार असल्यास त्याची थेट तक्रार शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली जाणार आहे.
तसेच आठ दिवसांत हा प्रश्न न सुटल्यास शिक्षणमंत्र्यांकडे याबाबत पाठपुरावा करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला जाईल, अशी भूमिका मोंडकर यांनी मांडली.
आगामी पालिका निवडणूक भाजपच जिंकेल, असा विश्वास व्यक्त करत त्यानंतर जनतेला अपेक्षित आराखडा साकारला जाईल, अशी ग्वाहीही मोंडकर यांनी यावेळी दिली.