सावंतवाडी : राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांचे सावंतवाडी शहरात ठिकठिकाणी दीपावली शुभेच्छा निमित्त लावण्यात आलेले बॅनर अज्ञाताकडून फाडण्यात आले आहेत. तसेच जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने तालुकास्तरीय कबड्डी फेडरेशन व दीपक केसरकर मित्र मंडळाच्यावतीने 18 व 19 नोव्हेंबर या दोन दिवशी सावंतवाडीत कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचेही बॅनर लावण्यात आले आहेत. हे बॅनर ही फाडण्यात आले आहेत. या घटनेनंतर शिंदे गट आक्रमक झाला असून पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्याकडे निवेदन देत बॅनर फाडले त्याच्यावर कारवाईची मागणी केली आहे. यावेळी तालुकाप्रमुख बबन राणे, बाबू कुडतरकर, गजानन नाटेकर, सव्पना नाटेकर, शर्वरी धारगळकर, परशुराम चलवाडी, शैलेश मेस्त्री आदि उपस्थित होते.मंत्री दीपक केसरकर यांनी दिवाळीला शुभेच्छा देणारे बॅनर शहरातील मुख्य चौकात ठिकठिकाणी लावले होते. त्यातील काही बॅनर अज्ञाताकडून फाडण्यात आले दोन दिवसापूर्वीच केसरकर याच्या विरोधात दोडामार्ग येथे बॅनर लावल्याची घटना ताजी असतानाच आता बॅनर फाडण्यात आल्याने खळबळ माजली आहे.सध्या केसरकर यांच्या विरोधात सध्या विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी आपली आमदारकीची उमेदवारीची घोषणा केल्यानंतर मंत्री केसरकर यांच्या विरोधात सध्या विरोधकांनी पोस्टरबाजी सुरू केली आहे . आणि त्याच अनुषंगाने सावंतवाडी शहरातील शुभेच्छांचे पोस्टर फाडण्यात आले असावेत असा प्राथमिक संशय शिंदे गटाकडून व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात केसरकर मित्र मंडळ व शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेत निवेदन देण्यात आले असून अज्ञाताचा शोध लावा अन्यथा पोलीस ठाण्यात आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी दिला आहे.
सावंतवाडीत मंत्री केसरकरांचे बॅनर अज्ञाताने फाडले, शिंदे गट आक्रमक
By अनंत खं.जाधव | Updated: November 17, 2023 17:43 IST