दोडामार्गात लाखोंचे नुकसान
By Admin | Updated: October 6, 2014 22:33 IST2014-10-06T21:41:41+5:302014-10-06T22:33:50+5:30
वादळी पाऊस : घरांची, शेती-बागायतीची हानी

दोडामार्गात लाखोंचे नुकसान
कसई दोडामार्ग : तालुक्यात गेले पाच दिवस पडणाऱ्या पावसामुळे व ढगांच्या प्रचंड गडगडाटामुळे तसेच चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात घरांचे व शेती-बागायतीचे नुकसान झाले आहे. घरांची कौले उडून जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रविवारी झालेल्या चक्रीवादळामुळे उसप गावाला तडाखा बसला
आहे. अंदाजे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले आहे, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. नुकसानीचा पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे अर्ज नसल्याने पंचनामे झाले नाहीत.
परतीच्या पावसाने तालुक्यात थैमान घातले आहे. विजेचा लोळ पडून साटेली-भेडशी येथील चैताली नाईक यांना जीव गमवावा लागला. तर उसप गावात चक्रीवादळामुळे गावावर मोठे संकट आणले. चक्रीवादळाचा वेग भयानक होता. यामध्ये सुमारे ५० घरांचे नुकसान झाले असून घरांची कौले उडून गेली आहेत. त्यामुळे ग्रामस्थ हतबल झाले आहेत. या चक्रीवादळात मोठमोठे वृक्ष उन्मळून काही घरांवर पडल्याने घरांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे अंदाजे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून त्यापेक्षाही नुकसानीचा आकडा वाढणार आहे. असे ग्रामस्थांनी सांगितले. नुकसानीमध्ये प्रकाश नाईक, विकास नाईक, विठ्ठल मोरजकर, दशरथ कळणेकर, पुंडलिक गवस, दत्तात्रय मळीक, सुभाष गवस, महालक्ष्मी गवस, अशोक गवस, विलास सावंत, विष्णू साटेलकर, विश्वनाथ साटेलकर, कानू नाईक, कृष्णा गवस आदींचा समावेश आहे. (वार्ताहर)
उसपला फटका
दोडामार्ग तालुक्यातील वादळामुळे उसप गावाला मोठा फटका फसला आहे. या गावातील सुमारे ५0 घरांचे नुकसान झाले. यामुळे या गावावर मोठे संकट निर्माण झाले आहे. वादळामुळे या गावातील घराची कौले, पत्रे उडून गेले. वादळामुळे उसप गावातील हजारो रुपयांचे नुकसान झाले असून या गावचे ग्रामस्थ हतबल झाले आहेत.