सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने लाखोंचे नुकसान
By Admin | Updated: October 1, 2014 00:48 IST2014-10-01T00:43:32+5:302014-10-01T00:48:24+5:30
भातशेती आडवी : सलग सहाव्या दिवशी वादळी पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने लाखोंचे नुकसान
सिंधुदुर्गनगरी : गेले सहा दिवस सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी पडझड सुरू असून, दूरध्वनी खांब, विद्युत खांब, घरांवर झाडे पडण्याचे सत्र सुरूच
असून, जिल्ह्यात यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळी पावसामुळे भातशेतीही आडवी झाली आहे. देवगड तालुक्यात ६६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात घटस्थापनेपासून पावसाने सुरुवात केली असून, केवळ दुपारच्या सत्रात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडत आहे. सतत सहा दिवस पडणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
दुपारी दोनच्या सुमारास मुख्यालयात पाऊस पडल्याने साऱ्यांचीच धावपळ उडाली. काही दिवसांनी भातशेती कापणीला वेग येणार आहे. भातशेती नुकतीच बहरात येत असून, वादळी पावसाच्या तडाख्यामुळे भातशेतीही आडवी झाली आहे. त्यामुळे याचा पंचनामा होणे आवश्यक असल्याचे मत काही शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. भातशेती नुकसानीची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
देवगडमध्ये वीज उपकरणे जळाली, घराचे पत्रे उडाली
देवगड तालुक्यात आज, मंगळवारी झालेल्या पावसामुळे ६६ हजार रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये नाद चव्हाणवाडी येथील सखाराम महादेव येरम यांच्या घरावर वीज पडल्याने भिंत कोसळून, तसेच वीज उपकरणे जळाल्याने ६,६५0 रुपयांचे नुकसान झाले. कुणकवण येथील सुमती दत्ताराम राऊत आणि सुरेश सीताराम राऊत यांचा सामाईक गोठा कोसळून ५५ हजारांचे नुकसान झाले. वाघिवरे येथील दीपक मधुकर मांजरेकर यांच्या घराचे पत्रे फुटून चार हजार रुपयांचे, तर साळशी येथील गोविंद भिवा लाड यांच्या घराची कौले उडाल्याने त्यांचे एक हजार रुपयांचे नुकसान झाले. तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. (प्रतिनिधी)