पर्यटन विकासकामांत लाखोंचा भ्रष्टाचार
By Admin | Updated: April 29, 2016 00:31 IST2016-04-28T20:51:20+5:302016-04-29T00:31:06+5:30
अनिल चव्हाण : आंबोली वनविभागाबाबत जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षकांकडे चौकशीची मागणी

पर्यटन विकासकामांत लाखोंचा भ्रष्टाचार
आंबोली : आंबोली वनविभागाने पर्यटननिधीतून केलेल्या कामात लाखोंचा भ्रष्टाचार करण्यात आला असून, या प्रकरणात उपवनसंरक्षक व जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी निवेदनातून केली आहे. आंबोलीत गतवर्षी वनपार्कमध्ये अनेक कामे करण्यात आली, पण या कामांच्या दर्जाकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. वनअधिकाऱ्यांना वारंवार सूचना, तक्रार करूनही त्याकडे जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात आली. यापेक्षा गंभीर बाब म्हणजे, याठिकाणी बहुतांश कामे केली नाहीत, पण कागदोपत्री ती झाल्याचे दाखवून ५० लाखांपेक्षा जादा रकमेवर डल्ला मारण्यात आला आहे. याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली असून, दोन महिन्यांपूर्वी येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी सर्व प्रकारची माहिती मागितली. त्यामुळे वनअधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. महिन्याभरात वर्षभराचा भ्रष्टाचार दडपण्यासाठी रंगरंगोटीची कामे जोरदार करून घेण्यात आली. निधी खर्ची घालण्यासाठी झाडांचे पार वगैरे रंगविण्यात आले. मात्र, ही कामे वनमजुरांकडून करण्यात आली. शासनाचा पगार असणाऱ्या वनमजुरांकडून ही कामे करण्यात आली असून, पर्यटनाचा निधी गिळंकृत करण्याच्या मुद्दा गडद झाला आहे.
शिवाय येथील वनबागेतील जुन्या खेळण्यांना रंग देऊन नवीन खेळणी खरेदी केल्याचे दाखवण्यात आले आहे. लॉन व सुशोभित झाडांवर खर्च दाखवण्यात आला. प्रत्यक्षात मात्र काहीच केले नाही. येथील नर्सरीवर यापूर्वी १४ लाख खर्चूनही त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. एकंदरीत जुन्याच कामांवर लाखो रुपये खर्च दाखवून ही रक्कम लुबाडण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
२०१० पासून २०१५ पर्यंत वनविभागाच्या उद्यानात जवळपास ९० लाख रुपये खर्च दाखवण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात तेवढ्या निधीची कामे करण्यात आलेली नाहीत. त्यामुुळे माहिती देण्यास सुरुवातीस अधिकाऱ्यांनी टाळाटाळ सुरू केली. मात्र, चव्हाण यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
पण ५० लाखांचा हिशेब कसा व कुठे दाखवणार, असा सवाल आता निर्माण झाला आहे. यापूर्वीचे वनक्षेत्रपाल बदली होऊन गेले आहेत. २०१० पासूनची माहिती मिळाली असून यामध्ये मत्स्यकी कमळाची टाकी गार्डन असा प्रवेशद्वारावर नामफलक आहे.
प्रत्यक्षात तेथे काहीच नाही. वर्षभरात दहा पर्यटकदेखील येथे जात नाहीत. कोणालाच येथील काहीच माहिती नाही. त्यामुळे येथे गोलमाल वाढला आहे. (वार्ताहर)
ही झाली बोगस कामे
सन २०१० साली चौकुळ-शिरगावकर पॉर्इंट येथे १८ लाख रुपये खर्चून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून वनविभागाने बोगस काम केले होते. प्रत्यक्षात तेथे वनअधिनियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीररीत्या काम वनअधिकाऱ्यांनी केले. मुळात शिरगावकर पॉर्इंट येथून दिसणार नाही. तो डाव्या बाजूला घेण्यात यावा, यासाठी ग्रामस्थांनी काम बंद पाडले होते व जिल्हाधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतीने मागणीही केली होती. मात्र, वनअधिकाऱ्यांनी मनमानी करत येथेच काम केले. तेही बोगस. प्रत्यक्षात दरडीच्या ठिकाणी ३५ लाख व ४५ लाख अशा दोनवेळच्या कामातून रेल्वेच्या रूळाप्रमाणे बसलेले लोखंडी काम उचकटून शिरगावकर पॉर्इंट येथे बसविण्यात आले. मात्र, येथे पुन्हा १८ लाख पर्यटनातून खर्च दाखवून काम करण्यात आले आहे.
पर्यटकांमधून नाराजीचा सूर
दहा दिवसांपूर्वीच शिरगावकर पॉर्इंट येथे विंग गॅलरी बसविली. यासाठी सव्वादोन लाख रुपये खर्च दाखवला. त्यामुळे ग्रामस्थांच्या मूळ मागणीला बगल देत हे काम करण्यात आले. यामुळे वनविभागाच्या आडमुठी धोरणाने विंग गॅलरीसुद्धा सदोष बनवली आहे. तीव्र उताराची ही गॅलरी सर्वांनाच धोकादायक आहे.
अशा प्रकारची सर्व कामे वनविभागाकडून केली गेल्याने पर्यटनाचा लाखोंचा निधी गायब झाला आहे. त्यामुळे येथील पर्यटनाला बाधा येत असून, पर्यटकांतून नाराजीचा सूर उमटत आहे.
तरी वनविभागाच्या या भ्रष्ट कारभाराची नि:पक्षपातीपणे चौकशी करून दोषींवर जिल्हाधिकारी व उपवनसंरक्षकांनी कारवाई करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.